वृत्तसंस्था/ पोश्च्स्ट्रूम
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चुरशीचा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील फिरकी गोलंदाज रवी बिस्नॉई आणि ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज तन्वीर सेनगा यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
अलिकडे क्रिकेटमध्ये पांढऱया रंगाचा चेंडू वापरल्यानंतर फिरकी गोलंदाजांनी आपली कमाल दाखविण्यास सुरूवात केली. याला कनिष्ठ क्रिकेटचा अपवाद नाही या स्पर्धेत भारतीय संघातील फिरकी गोलंदाज बिस्नॉई हा सर्वात चतुर गोलंदाज असून त्याचा लाभ मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाला मिळू शकेल. या महत्त्वाच्या स्पर्धेत बिस्नॉईने तीन सामन्यांतून 10 बळी मिळविले आहेत. न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात त्याने 30 धावांत 4 गडी बाद करून सामन्याला कलांटणी दिली. आयपीएल स्पर्धेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने दोन कोटी रूपयांच्या बोलीवर बिस्नॉईला खरेदी केले आहे.
ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज तन्वीर सेनगा याने या स्पर्धेत आपल्या फिरकी गोलंदाजीवर खळबळ माजविली असून त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 10 गडी बाद केले आहेत. दुबळय़ा नायजेरियाविरूद्ध 14 धावांत 5 गडी बाद केले तर विंडीजविरूद्ध त्याने 4 बळी तर इंग्लंडविरूद्ध त्याने 1 गडी बाद केला आहे. भारतीय वंशाच्या तन्वीर सेनगा आणि बिस्नॉई यांच्या फिरकीची कमाल मंगळवारच्या सामन्यात शौकिनांना पाहावयास मिळेल. कनिष्ठच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. 2013 पासून झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेतील पाच सामन्यांपैकी भारताने 4 सामने जिंकले आहेत तरश उभय संघातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारतीय युवा संघातील जस्वाल, सक्sसेना आणि कर्णधार प्रियाम गर्ग यांच्या फलंदाजीत सातत्य दिसून येते. कार्तिक त्यागी, आकाश सिंग, अंकोलेकर व रवी बिस्नॉई हे भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू इयान हार्वे यांचा पुतण्या मॅकेंझी हार्वे याच्याकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व राहील.