ब्लोमफौंटेन (द. आफ्रिका) / वृत्तसंस्था
जेतेपद राखण्याच्या मोहिमेला दमदार सुरुवात केल्यानंतर भारतीय संघ आज आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत पदार्पणवीर जपानचा धुव्वा उडवण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. भारताने यापूर्वी रविवारी झालेल्या सलामी लढतीत श्रीलंकेचा 90 धावांनी धुव्वा उडवला तर जपानचा संघ शनिवारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द होत एक गुण मिळाल्याने सुदैवी ठरला.
अ गटात सध्या भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर असून येथे जपानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्यांचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होईल. या लढतीनंतर भारतीय संघाची शेवटची साखळी लढत दि. 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
भारताने यापूर्वी रविवारी विद्यमान जेत्यांना साजेशा थाटात तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवले होते. प्रारंभी, सलामीवीर यशस्वी जैस्वाल (74 चेंडूत 59) व कर्णधार प्रियम गर्ग (72 चेंडूत 56) यांच्या अर्धशतकांमुळे भारताने 4 बाद 297 धावांचा डोंगर रचला. उपकर्णधार ध्रुव जुरेलने 48 चेंडूत जलद 52 धावा फटकावल्या तर अष्टपैलू सिद्धेश वीरने 27 चेंडूत 44 व 6 षटकात 34 धावात 2 बळी, असे लक्षवेधी योगदान दिले.
नंतर गोलंदाजांनी लंकन फलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांचा डाव 45.2 षटकात 207 धावांवर संपुष्टात आणला. डावखुरा जलद गोलंदाज आकाश सिंग (2-29), वीर (2-34) व लेगस्पिनर रवी बिश्नोई (2-44) यांनी एकत्रित 6 बळी घेतले. जलद गोलंदाज कार्तिक त्यागीने (1-27) यादरम्यान पुन्हा एकदा प्रतितास 140 किमी वेगाने गोलंदाजी केली. जपानविरुद्ध आजच्या लढतीत नाणेफेक जिंकल्यास भारत प्रथम फलंदाजी स्वीकारत मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करेल, असे संकेत आहेत.
संभाव्य संघ
भारत यू-19 : प्रियम गर्ग (कर्णधार), आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगडे, यशस्वी जैस्वाल, धुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, दिव्यांश जोशी.
जपान यू-19 : मार्कस थुरगेट (कर्णधार), तुषार चतुर्वेदी, मॅक्झिमिलन क्लेमेंटस, नील डेट, केन्टो डॉबेल, सोरा इचिकी, इशान फर्तियल, लिओन मेहलिग, मासातो मोरिटा, शू नोगुची, युगंधर रेठरेकर, देबाशिश साहू, रिजी सूतो, काझुमासा ताकाहाशी, ऍश्ले थुरगेट.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.