पदत्याग करताना झाले भावुक : आता नवे मुख्यमंत्री कोण? उत्सुकता शिगेला
प्रतिनिधी /बेंगळूर
गेला आठवडाभर ज्या शक्यतेची चर्चा राजकीय वर्तुळात होती ती अखेर खरी ठरली आहे. कर्नाटक राज्य भाजपचे गेले तीस वर्षे आधारस्तंभ असलेले नेते आणि गेली दोन वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असलेले बुकनकेरे सिद्धलिंगाप्पा येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल. आता नवा मुख्यमंत्री कोण, हा उत्सुकतेचा विषय असून अनेक नावे चर्चेत आहेत.
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा मागील महिन्यापासून सुरू होती. गेल्या आठवडय़ात येडियुराप्पा यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याचे संकेत मिळाले होते. भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी सकाळी विधानसौधमध्ये ‘साधना’ मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात कामगिरीचा ओघवता आढावा घेत राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी भावुक झालेल्या येडियुराप्पांना अश्रू आवरता आले नाहीत. कार्यक्रम संपल्यानंतर मंत्र्यांसोबत त्यांनी भोजनही घेतले.
एकंदर चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या येडियुराप्पा यांना वय आणि प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन पदावरुन दूर केल्याचेही बोलले जात आहे. राज्यातील लिंगायत समुदायाची नाराजी ओढवून घ्यावी लागू नये यासाठी याच समुदायातील युवा नेत्याला मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा विचारही सुरू आहे. तर दुसरीकडे येडियुराप्पा यांना 2023 मध्ये होणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत पक्षसंघटनेची धुरा सोपविण्यात येईल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
येडिंकडे हंगामी मुख्यमंत्रिपद
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असला तरी नव्या मुख्यमंत्र्याची नेमणूक होईपर्यंत येडियुराप्पा हेच हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत. राजीमानापत्र स्वीकारल्यानंतर राज्यपालांनी त्यांना तशी सूचना केली आहे.
मंत्रिमंडळ विसर्जित
येडियुराप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येडियुराप्पांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिमंडळ विसर्जित केले आहे. त्यामुळे सर्वच मंत्र्यांना अधिकार गमवावे लागले आहे. तथापि, ही तांत्रिक प्रक्रिया आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा नियमानुसार संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा असतो. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. याआधी मंत्रिपदी असणाऱयांपैकी किती जणांना पुन्हा संधी मिळेल, याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा अध्यक्षही शर्यतीत
नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी कोणाची वर्णी लावावी, याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी विचार करीत आहेत. पाच ते सहा जणांची नावे चर्चेत असली तरी कोणाला संधी मिळणार याविषयी गुरुवारीच स्पष्टता येईल, अशी शक्यता आहे. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
चौथ्या वेळेसही कार्यकाळ अपूर्ण
चारवेळा मुख्यमंत्रिपदावर राहिलेले येडियुराप्पा यांना एकदाही पदाचा कार्यकाळ पूर्ण करणे शक्य झालेले नाही. यापूर्वी निजद-भाजपमधील युती फिसकटल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी येडियुराप्पा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र, केवळ आठवडय़ातच म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
30 मे 2008 मध्ये येडियुराप्पांनी दुसऱयांदा मुख्यमंत्रिपद स्वीकारले. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना 31 जुलै 2012 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. 17 मे 2018 रोजी ते तिसऱयांदा मुख्यमंत्रिदावर विराजमान झाले. मात्र, विश्वासदर्शक ठराव जिंकता न आल्याने त्यांनी दोन दिवसात म्हणजेच 19 मे 2018 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर निजद-काँग्रेस युतीचे सरकार सत्तेवर आले. या दोन्ही पक्षातील एकूण 17 पक्षत्याग केला. या सर्व नेत्यांनी नंतर भाजपमध्ये येऊन विधानसभा निवडणूक लढविली. त्यामुळे विद्यमान सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे पुन्हा एकदा येडियुराप्पांच्या गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. 26 जुलै 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. सोमवारी या पदाची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
राजीनामा स्वेच्छेने
राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, 75 वर्षांवरील कोणालाही पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाची संधी दिलेली नाही. मात्र, आपल्याला संधी मिळाली. त्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, जे. पी. नड्डा यांचा आभारी आहे. राजीनाम्यासाठी आपल्यावर कोणीही दबाव आणला नाही. स्वच्छेने राजीनामा दिला आहे. दोन महिन्यापूर्वीच आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्या अधिकारपदाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच राजीनामा द्या असा पक्षश्रेष्ठींचा संदेश होता. त्यानुसार निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्यपालपद स्वीकारणार नाही
भाजपच्या पक्ष संघटनेसाठी परिश्रम घेणार आहे. आपण निवृत्त झालेलो नाही. राज्यपालपद दिले तरी ते स्वीकारणार नाही. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीच सांगितले आहे. चारवेळा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिल्याबद्दल राज्यातील जनतेचा आभारी आहे. आपल्याला या उच्च पदावर येण्यासाठी सहकार्य केलेल्या शिकारीपूर येथील जनतेचे विस्मरण होणे शक्य नाही, अशी भावुक प्रतिक्रिया येडियुराप्पा यांनी साश्रू नयनांनी दिली.
क्लार्क ते मुख्यमंत्री : येडिंचा राजकीय प्रवास
दक्षिण भारतात प्रथमच भाजपला सत्तेवर आणण्यात यशस्वी ठरलेल्या बी. एस. येडियुराप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी मंडय़ा जिल्हय़ातील बुकनकेरे येथे झाला. शिमोग्यात 1965 मध्ये पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजकल्याण खात्यात क्लार्क म्हणून नोकरी सुरू केली. मात्र, काही महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. नंतर शिमोगा जिल्हय़ातील शिकारीपूर येथे ते स्थायिक झाले. तेथील एका भात गिरणीत क्लार्क म्हणून सुरूवात केली. वैवाहिक जीवनाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी शिमोग्यात हार्डवेअर दुकान उघडले. त्याचवेळी रा. स्व. संघमध्ये सक्रिय झाले. 1970 मध्ये संघाच्या शिकारीपूर विभागाचे कार्यवाह बनले. नंतर तालुका अध्यक्ष झाले. 1972 मध्ये शिकारीपूर नगरपालिकेवर निवडून गेले. 1983 मध्ये शिकारीपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर सहावेळा ते विधानसभेवर तर एकदा लोकसभेवर निवडून आले होते. 1985 मध्ये शिमोगा जिल्हा भाजप अध्यक्ष, 1988 मध्ये राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून राजकारणात आपले वर्चस्व निर्माण केले.
राजकीय प्रवास…
- 1972 शिकारीपूर तालुका रा. स्व. संघ अध्यक्ष
- 1975 शिकारीपूर नगरपालिकेवर निवड
- 1980 शिकारीपूर तालुका भाजप अध्यक्ष
- 1983 पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश
- 1983 शिमोगा जिल्हा भाजप अध्यक्ष
- 1988 कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष
- 1992 भाजपचे राष्ट्रीय सचिव
- 1994 दुसऱयांदा विधानसभेत प्रवेश, विरोधी पक्षनेता
- 1999 कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष
- 2000 विधान परिषद सदस्य
- 2004 तिसऱयांदा विधानसभेत प्रवेश, विरोधी पक्षनेता
- 2006 निजद-भाजप युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
- 2007 पहिल्यांदा मुख्यमंत्री
- 2008 चौथ्यांदा विधानसभेवर, दुसऱयांदा मुख्यमंत्री
- 2013 पाचव्यांदा विधानसभा सदस्य
- 2014 लोकसभा निवडणुकीत विजयी
- 2018 सहाव्यांदा विधानसभा सदस्य, तिसऱयांदा मुख्यमंत्री
- 2019 चौथ्यांदा मुख्यमंत्री