स्वीय साहाय्यकासह गृहकार्यालयातील अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्र्यांच्या गृहकार्यालयातील काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना देखील संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्यांनी शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे स्वतःहून होम क्वारंटाईन करून घेतले असून शुक्रवारपासून काही दिवस ते घरातूनच काम पाहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक, कारचालक आणि बेंगळूरच्या गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथील इलेक्ट्रिशियन, पर्यायी वाहन चालक तसेच स्वयंपाकी कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांनी खबरदारी म्हणून शुक्रवारपासून काही दिवस घराबाहेर न पडल्याचा निर्णय घेतला असून नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नाहीत. काही बैठकाही त्यांनी रद्द केल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या विधानपरिषदेच्या 7 सदस्यांना निरोप देण्याच कार्यक्रम शुक्रवारी झाला. या कार्यक्रमात येडियुराप्पा सहभागी होणार होते. मात्र, कार्यालय व इतर कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली असून आपण घरात राहूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमापून बैठक, आवश्यक सल्ले, सूचना देणार आहे. आपल्या भेटीसाठी कोणत्याही अधिकारी, आमदार, नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.