– नगरसेवकांचा इशारा
प्रतिनिधी /म्हापसा
खोर्ली म्हापसा सीम येथे गेल्या वर्षापासून येथील नाला भरून वाहत आहे. यंदा ही समस्या जटील झालेली आहे. सध्या या नाल्यातील घाणीचे पाणी नाला भरून रस्त्यावरून वाहत असल्याने या भागातून ये-जा करणाऱया दुचाकीधारक तसेच पादचाऱयांच्या अंगावर हे पाणी सांडत आहे. म्हापशाचे आमदार, नगराध्यक्ष आदींनी या नाल्याची पाहणी व हा नाला दुरुस्त करणार असल्याचे आश्वासनही दिले मात्र ते आश्वासन हवेत विरल्यात जमा आहे. येथे दुसरा नाला उभारावा असा ठरावही पालिका बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र आमदार जोशुआ डिसोझा आम्ही विरोधक असल्याने सुडाचे राजकारण करीत आहे. हा जनतेचा प्रश्न असून या ठिकाणी राजकारण करू नका. येत्या 8 दिवसाच्या आत या नाल्याची दुरुस्ती न केल्यास या नाल्याविरोधात म्हापसा काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन छेडून पालिकेच्या निषेधार्थ रस्त्यावर ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर व नगरसेविका अन्वी अमय कोरगांवकर यांनी म्हापसा येथे दिला.
यावेळी अमय कोरगांवकर, दिलीप नाटेकर, दिपेश शिंदे, प्रवीण आसोलकर, महाबळेश्वर तोरस्कर, सुदेश तिवरेकर, अमानसियो तिवरेकर, पांडुरंग सावंत, नंदकिशोर धावस्कर, शेखर नाईक, नारायण राठवड आदी मान्यवर उपस्थित होते.
आठ दिवसात काम हाती न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार- सुधीर कांदोळकर
म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक तथा काँग्रेस नेते सुधीर कांदोळकर यावेळी बोलताना म्हणाले की, आज लोकशाही पद्धतीने आम्ही खोर्ली सीम येथे जमलो आहोत. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा म्हणतात विकास होत आहे मग हाच काय तो विकास? दोन महिने पूर्ण झाले म्हापसा खोर्ली सीम येथे गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. हा गटार जलसंचन खात्यास पडतो. हा मुख्य नाला असून या नाल्यातून सर्व घाण डोंगराळ भागातून वाहून येते व खोर्ली सीम येथे गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे व सर्व पाणी नागरिकावर सांडत आहे. अशी माहिती श्री. कांदोळकर यांनी दिली. या वाटेतून लोकप्रतिनिधी ये-जा करतात मात्र त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. हे काम येत्या 8 दिवसाच्या आत करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. हा गंभीर विषय आहे. म्हापशाच्या आमदाराचे येथे लक्ष नाही. त्यांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा अशी मागणी श्री. कांदोळकर यांनी केली. मलनिःस्सारण समस्याला हे नाले कारणीभूत आहेत. ती म्हापशाची घाण आहे त्यासाठी 10 वर्षापूर्वी मलनिःस्सारण प्रकल्प सुमारे 90 कोटी खर्चून पाईपलाईन घालण्यात आली आहे. मात्र हे काम अद्याप होत नाही. येथे आमदारांनी लक्ष द्यावे. फक्त आश्वासने देतात. तार नदीत हे पाणी जाते. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. आठ दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी काँग्रेस नेते तथा नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी दिला.
नवीन नाला बांधण्याचा ठराव घेऊनही पालिकेचे दुर्लक्ष- नगरसेविका अन्वी कोरगावकर
खोर्ली सीम नाल्याची समस्या गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र यंदा या पावसात नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला. आतमध्ये पाईप भरलेले आहे त्यामुळे वर येऊन रस्त्यावरून वाहते. याबाबत मुख्याधिकाऱयांना हे निदर्शनास आणून दिले आहे. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्यासह आम्ही अधिकारी वर्गासमवेत येथील नाल्याची पाहणी केली आहे. पालिकेत ठरावही मंजूर झाला आहे की, येथे नवीन नाला बांधावा मात्र येथील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वॉर्डच्या नगरसेविका अन्वी अमय कोरगांवकर यांनी केला. पालिका याकडे काहीच कारवाई करीत नाही. ही समस्या पालिकेने त्वरित सोडवावी अन्यथा येत्या आठ दिवसात हा नाला साफ न केल्यास आम्ही येथे आंदोलन छेडून रस्त्यावर ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भेदभाव न करता समस्या सोडवा- प्रवीण आसोलकर
म्हापसा युथचे प्रवीण आसोलकर म्हणाले की, या रस्त्यावर वाहणाऱया दुर्गंधी नाल्याच्या पाण्याकडे भाजपा काँग्रेस असा भेदभाव करू नका. हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे येथे लोक जे-जा करीत आहे. पालिकेने याबाबत समस्या सोडवावी. निवडून आलेले लोकप्रतिनिधी राजकीय सुड उगविण्यास पुढे येत आहे हे न करता ही समस्या सोडविण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी माहिती आसोलकर यांनी दिली.
विहिरी दुषीत झाल्यास जबाबदार कोण
काँग्रेस युवा अध्यक्ष अमानसिओ तिवरेकर म्हणाले, दोन महिने झाले येथील नाल्याचे सर्व पाणी रस्त्यावर वाहत आहे व ते पाणी शेतात जाते. या बाजूला दहा विहिरी आहे. पाणी दुषीत झाल्यास जबाबदार कोण? येथे भाजप कार्यालय आहे. भाजप राजकारण करीत आहे आणि समाजकारण तेथेच राहिले आहे. हे काम पालिकेने त्वरित करून घ्यावे अशी मागणी तिवरेकर यांनी केली.
वैयक्तिक राग बाजूला ठेवून समस्या सोडवा
अमेय कोरगांवकर यांनी सांगितले की, नगराध्यक्षांनी व आमदारांनी येथे दिड महिन्यापूर्वी येथे पाहणी करून हे काम करून घेणार असे स्पष्ट केले होते. मात्र आज महिना उलटला तरी याकडे दुर्लक्ष झालेले आहे. वैयक्तिक बाबी बाजूला ठेवून आमदारांनी हे काम त्वरित करावे. विरोधक म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करू नये, आम्ही कडक धोरण अवलंबविल्यास आम्हाला जबाबदार धरू नये असा इशाराही यावेळी कोरगांवकर यांनी दिला.