मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्गार
प्रतिनिधी / पणजी
जगभरात गोवा पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. येत्या काळामध्ये गोवा एक नामांकित असे शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्धीला येणार आहे. सध्या गोव्यामध्ये अनेक शिक्षण संस्थांनी चांगली शिक्षण संकुले उभारली आहेत. याशिवाय चार ते पाच शिक्षण संस्थांनी संस्था उभारण्यासाठी आपली तयारी दाखविली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये गोवा एक उत्तम शैक्षणिक हब म्हणून उदयाला येईल तसेच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना गोव्यात मिळणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
कुजिरा बांबोळी येथे डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारीत प्रकल्पाचे तथा उच्च माध्यमिक विद्यालय इमारत प्रकल्पाचे उद्घाटन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांताक्रूजचे आमदार आंतोनियो फर्नांडिस, पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे चेअरमन रवींद्रर सिंग धिल्लो तसेच एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेसचे चेअरमन राजीव शर्मा व कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते कुजिरा बांबोळी येथे डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारीत प्रकल्पाचे तथा उच्च माध्यमिक विद्यालय इमारत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीअंतर्गत पावर फायनान्स कॉर्पोरेशन पीएफसीतर्फे तीन कोटी रूपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली आहे.
मी सभापती असताना हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारीकरण इमारतीच्या प्रकल्पासाठी करार करण्यात आला होता. संदीप चोडणेकर हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते.आता मुख्यमंत्रीपदावर आहे आणि या प्रकल्पाचे उद्घाटन करत आहे. यंदा हेडगेवार शाळेच्या विस्तारीत प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्याचा करार करण्यात येईल आणि पुढच्या वर्षी त्याचे उद्घाटन होईल. याशिवाय हेडगेवार विद्यालयाने मागील कित्येक वर्षापासून आपले नाव रूजविले आहे. संस्कारमय विद्यार्थी या विद्यालयातून शिक्षण घेऊन जातात. सरकारतर्फे पूर्ण सहकार्य मिळेल. दोन तालुकामध्ये सुरू करण्यात येणाऱया शाळेसाठी सरकारतर्फे सहकार्य मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मांदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करताना सामाजिक संस्था, उद्योजक शिक्षण संस्था व सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक सुधारणा घडवून आणण्यासाठी संकल्प केला आहे. सामाजिक बांधिलकीअंतर्गत डॉ. के.बी. हेडगेवार विद्यालय शिक्षण संस्थेसाठी हे उच्च माध्यमिक विद्यालय इमारत उभी झाली आहे असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारीत प्रकल्पाचे तथा उच्च माध्यमिक विद्यालय इमारतीच्या अंतर्गत भागांमध्ये ज्याकाही आणखी सुविधा हव्यात त्याही सुविधा उपलब्ध करण्यासाठी पीएफसी आर्थिक निधी देणार असल्याचे पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे चेअरमन रवींद्रर सिंग धिल्लो यांनी यावेळी सांगितले.
येत्या काळामध्ये गोव्यात जास्तीत जास्त सौर उर्जेची उपकरणे उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर गोव्यामध्ये कमी दरामध्ये वाजवी किमतीत एलईडी बल्ब उपलब्ध करणार असल्याचेही एनर्जी एफसी सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष राजीव शर्मा यांनी सांगितले. मागील सलग चौदा वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षामध्ये शंभरटक्के निकाल देणारे हेडगेवार शिक्षण संस्था आहे. येत्या काळामध्ये राज्यामधील तीन ठिकाणी संस्थेच्या शाळांचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे संस्थेचे सचिव सुभाष देसाई यांनी सांगितले. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दीपक आमोणकर यांनी आभारप्रकटन केले. सूत्रसंचालन स्नेहा पेडणेकर यांनी केले.
सरकारी खात्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने घेणार
सरकारची विविध खात्याची सर्व पेट्रोल, डिझेल वाहने बदलून इलेक्ट्रीक वाहने घेण्यात येतील. अनेक खात्यांनी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर चालू केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कुजिरा-बांबोळी येथील डॉ. हेडगेवार इमारतीच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. येणाऱय एक-दोन वर्षात गोवा राज्य हे ‘एज्युकेशन हब’ म्हणून ओळखले जाणार आहे. दोन-तीन शैक्षणिक संस्थांनी इन्स्टीटय़ूट उभारण्यासाठी सरकारकडे संपर्क केला आहे. गोव्यात आता सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय उपलब्ध होत असून कालांतराने हे राज्य ‘एज्युकेशन हब’ होईल असा विश्वास त्यांनी वर्तवला.