ऑनलाईन टीम / मुंबई :
अंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन कोरोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून मुंबई शहरातून घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
घरोघरी लसीकरणाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून उच्च न्यायालयाने आग्रही भूमिका घेतली होती. घरोघरी लसीकरणाचा गांभीर्यांने विचार करा, अशा सूचना न्यायालयाने मुंबई महापालिका व राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेने अशी मोहिम सुरु करण्याची तयारी दर्शवली व त्यानुसार पालिकेने तयारीही सुरु केली होती.
मुंबई उच्च न्यायालयात आज कोरोना विषयक याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी 1 ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच, या लसी महापालिकेतर्फे देण्यात येणार असून त्या मोफत असणार आहेत, अशी माहिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनिल साखरे यांनी दिली.
घरोघरी लसीकरणाची सुरुवात पुण्यातून सुरू होणार असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. मात्र, आता घरात जाऊन लस देण्याचा पथदर्शी प्रकल्प आम्ही मुंबईत करू, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली आहे.