मध्यप्रदेशात मुलींसाठी सरकारकडून यापूर्वीच लाडली लक्ष्मी योजना आणि मुख्यमंत्री कन्यादान यासारख्या योजना सुरू आहेत, पण राज्यातील शाजापूर जिल्हय़ातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी एक नवे पाऊल उचलले आहे. यांतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत निर्मित घरांचे नामकरण कुटुंबातील मुलींच्या नावावर करण्यात आले आहे. शाजापूर जिल्हय़ात अशी अनेक गावे आहेत, जेथे घरांची ओळख मुलींच्या नावाने होते. घराबाहेरील भिंतीवर घरमालक म्हणून मुलींचे नाव लिहिण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सीईओ मिशा सिंग यांनी घरांमध्ये मुली असलेल्या योजनेच्या लाभार्थींची यादी तयार केले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना समजावून घराबाहेर मुलींचे नाव लिहिण्यास तयार केले. एकाही लाभार्थीने हा प्रस्ताव नाकारला नाही. अत्यंत आनंदाने स्वतःच्या घराबाहेर मुलींचे नाव नोंदविण्याची तयारी दर्शविली. जिल्हय़ातील हजारो घरांना आता मुलींचे नाव मिळाले आहे. शाजापूर जिल्हय़ातील हा उपक्रम अत्यंत अनुकरणीय आहे. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आता वाढत आहे.