प्रतिनिधी/ वडूज
येलमरवाडी ता. खटाव येथे अज्ञातांकडून सत्तर वर्षीय हिराबाई दगडू जगताप या निराधार महिलेचा डोक्यात घाव घालुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी बारा तासाच्या आत दोन महिलेसह एका मध्यमवयीन पुरुषांस अटक केली आहे.
या बाबत घटनास्थळावरुन व पोलिससुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, मयत हिराबाई दगडू जगताप रा. एनकुळ ता.खटाव ही निराधार असून आपला भाउ शामराव कांबळे व भाचा गौतम नलवडे यांच्या आश्रयाने ती आपल्या माहेरी येलमरवाडी येथे एकटीच राहात होती. ती गावामध्ये घरोघरी भाकरी मागुन उदरनिर्वाह करीत होती. रविवार दि. 12 रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या गावतील एक युवक लघुशंकेसाठी गेला असता त्यास मृतदेह दिसून आला. मयत हिराबाई जगताप यांचा मृतदेह बाळकृष्ण पांडुरंग पोळ यांच्या घराशेजारी सापडला. त्यांच्या डोक्याला घाव घातलेल्या मोठया जखमा दिसून येत होत्या. सदर माहीती येलमरवाडी येथील पोलीस पाटील प्रशांत बागल यांना देण्यात आली. बागल यांनी सदरच्या घटनेची माहिती तातडीने वडूज पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व
मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर खून कोणी केला? का केला? कशासाठी? केला याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मयताचा भाचा गौतम नलवडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध फिर्याद नोंदवून तक्रार दिली आहे. याचा तपास वडूज पोलिसस्टेशनच्या पोलिस निरिक्षक एस ए पालेकर या करीत आहेत.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, वडुजचे सपोनि मालोजी देशमुख, दहिवडी चे सपोनि संतोष तासगावकर,औंधचे सपोनि प्रशांत बधे यांच्यासह पोलीस कर्मचायांनी भेट देऊन पाहणी केली.