येळ्ळूर डॉक्टर संघटना, चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करु नये
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळातही आम्ही येळ्ळूरच्या जनतेला सेवा दिली आहे. यापुढेही सेवा देण्यास सदैव तयार आहे. मात्र कोणीही चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करु नये, असे आवाहन येळ्ळूर डॉक्टर संघटनेने केले आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये कोविड-19 नियंत्रण समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये दवाखान्या बंद असल्या संदर्भात चर्चा झाली नसताना पत्रकारांना काही जणांना चुकीची माहिती दिली आहे. आम्ही येळ्ळूरच्या जनतेला नेहमीच सेवा दिली आहे. कोरोना काळातही आम्ही काम करत आहे. मात्र काही कारणास्तव एखादा किंवा दुसरा दिवस दवाखाने बंद करावे लागतात. मात्र आम्ही नेहमीच दवाखाने बंद ठेवतो, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
येळ्ळूरमधील 9 खासगी दवाखाने नेहमीच सेवा देत आहेत. काही डॉक्टर तर घरी जावूनही रुग्णांवर उपचार करत आहेत. यापुढेही आम्ही सेवा देणार आहे. मात्र डॉक्टरही शेवटी मनुष्यच आहेत. त्यांनाही वैयक्तिक अडचणी येतात किंवा तेही आजारी पडतात अशावेळी दवाखाने बंद ठेवावे लागतात. असे डॉक्टर संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तेंव्हा प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. दवाखान्यांची पायरी चढताना तोंडाला मास्क घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे असे प्रकार घडत आहेत. याचबरोबर काम नसताना घरातून बाहेर पडणे हे देखील चुकीचे आहे. तेंव्हा जनतेनेही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. सतत तोंडाला मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, वरचेवर हात धुवा ही काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे. येळ्ळूर डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. मुचंडी, डॉ. मनोज दिक्षित, डॉ. सतीश पाटील, डॉ. तानाजी पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. कुलदीप लाड, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुहास पाटील आणि डॉ. जोशी यांनी या पत्रकाव्दारे कळविले आहे.