ग्राम पंचायतच्या माध्यमातून उपक्रम : नियम पालनचे आवाहन
प्रतिनिधी / येळ्ळूर
कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत चालले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वत्रच प्रयत्न सुरू आहेत. येळ्ळूर ग्राम पंचायतीनेही येळ्ळूर परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी ग्राम पंचायतच्या माध्यमातून गावामध्ये फवारणी करण्यात आली.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेव्हा प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रा.पं.तर्फे करण्यात आले आहे. प्रत्येकाने तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर ठेवावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आपला परिसर स्वच्छ ठेवावा, सध्यातरी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, असे असले तरी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. अन्यथा, मोठय़ा समस्येला साऱयांनाच तोंड द्यावे लागणार आहे. संपूर्ण गावामध्ये आता फवारणी करण्यात येणार आहे. रविवारी शिवाजी रोड, चांगळेश्वरी गल्ली यासह इतर परिसरात फवारणी करण्यात आली आहे.
यावेळी टास्क फोर्स कमिटीचे सदस्य, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, महेश कानशिडे, दयानंद उघाडे, प्रमोद पाटील, राकेश परीट, जोतिबा चौगुले, परशराम परीट, अरविंद पाटील, कल्लाप्पा मेलगे, माजी उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, पीडीओ अरुण नायक, ग्रा. पं. कर्मचारी उदय हुंदरे, कलमेश पुण्यानवर व इतर कर्मचारी उपस्थित होते.