म. ए. समितीच्यावतीने शिवाजी नांदुरकर यांनी भरला अर्ज
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर वॉर्ड क्रमांक 8 मधील ग्रामपंचायत सदस्य महेश कानशिडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे ती जागा रिक्त झाली होती. त्या वॉर्डाची निवडणूक येत्या 27 रोजी होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. म. ए. समितीतर्फे शिवाजी नांदुरकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे शिवाजी नांदुरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. संपूर्ण वॉर्डातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी त्यांचे नाव जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर तानाजी हलगेकर, परशराम मोटराचे, श्रीकांत नांदुरकर, विजय धुळजी यांचे अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी अर्जांची छाननी होणार आहे.
पीडीओ व निवडणूक अधिकारी अरुण नायक यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी ग्रा. पं.अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, दयानंद उघाडे, राकेश परीट, परशराम परीट, परशुराम घाडी, भरत मासेकर, सूर्यकांत नांदुरकर, शालन पोटे, पार्वती रजपूत, अनुसया परीट, वनिता परीट, सोनाली येळ्ळूरकर, कृष्णा शहापूरकर, सुनिता नांदुरकर, विमल घाडी, अनिता नांदुरकर, प्रणाली नांदुरकर, मोनेश्री गोरल, अनिल कंग्राळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.