सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद : गुंडांच्या भ्याड कृत्याचा सर्वत्र निषेध
प्रतिनिधी /येळ्ळूर
सोमवारी कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानकपणे मूठभर कन्नड गुंडांनी पोलीस संरक्षणात दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केली. यामुळे संपूर्ण सीमाभागात खळबळ माजली. परिणामी मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली होती. येळ्ळूरमध्ये कडकडीत बंद पाळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
सकाळपासूनच येळ्ळूर येथील सर्व दुकाने, इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शाईफेकविरोधात बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. येळ्ळूरवासियांनी एकजुटीने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. बेळगाव शहरासह इतर परिसरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे गावात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गावातील प्रत्येक व्यापाऱयाने सहकार्य करत घटनेचा निषेध नोंदविला आहे. पोलीस संरक्षणात नेहमीच कन्नड गुंड हा प्रकार करत असल्याचा आरोपही यावेळी निषेध फेरीत करण्यात आला.
येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सचिव प्रकाश अष्टेकर, राजू पावले, परशराम घाडी, मधू पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, राकेश परीट, परशराम परीट, जयसिंग रजपूत, राजू डोण्याण्णावर, भरत मासेकर, बाळू पाटील, सूरज गोरल, नागेश बोबाटे, पेंटर अमोल जाधव, प्रकाश घाडी आदी उपस्थित होते.