ऑनलाईन टीम / मुंबई :
टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे आज निधन झाले आहे. त्या 34 वर्षांच्या होत्या.
ये रिश्ता… या मालिकेत ‘गुलाबो’ ही व्यक्तिरेखा साकारणारी दिव्या हिला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून दिव्या या गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात व्हेंटिलेटर होत्या. दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते, तिची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी यांनी या अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युवराजने सांगितले की, ‘दिव्याचा मृत्यू सकाळी 3 वाजता झाला. दिव्याला हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री अडीच वाजता अचानक तिची प्रकृती खालावली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यानंतर 3 वाजता डॉक्टरांनी सांगितले की, दिव्या आता या जगात नाही. ही बातमी माझ्यासाठी आणि दिव्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो’.
दिव्या यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शिवाय दिव्या सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हा कभी ना, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से, तेरा यार हूं मैं सारख्या मालिकांमध्ये काम केले होते.