अस्मिता मोहिते / सातारा :
आदीशक्ती देवीची नऊ वेगवेगळी रूपे आपण नवरात्रीत पुजतो प्रत्येक स्त्रीमध्ये तिचे तेज, सामर्थ्य, तिची शक्ती एकवटलेली असते. फक्त ती जागृत होण्याचा अवकाश आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य प्रत्येक स्त्रीशक्तीमध्ये आहे. याच स्त्री शक्तीचे एक रूप म्हणजेच योगगुरू उमा चौगुले…
“कळीमध्ये जशी पूर्ण उमलण्याची क्षमता असते, तशी मानवी जीवनामध्ये पूर्ण बहरण्याची क्षमता असते आणि मानवी क्षमतेचे पूर्णपणे बहरणे म्हणजेच योग होय”
भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासुनच योगसाधनेला अधिक महत्व होतेच त्यातच संपुर्ण जगभर कोरोना महामारीच्या संकटामध्ये योगप्राणायमाचे महत्व संपुर्ण जगाने मान्य केले आहे. याच योगक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय योगगुरू उमा सुभाष चौगुले यांचे नाव अगदी आदराने घेतले जाते.
स्वत:चा प्रपंच, एकत्र कुटुंब, दोन मुले घरदार यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत तसेच कौटुंबिक व सामाजिक अनेक संकटांवर मात करत त्या गेली 22 वर्षे योगप्राणायमाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यांची मुलगी अश्विनी डॉक्टर असुन मुलगा अर्जुन इंजिनियर आहे. उमा चौगुले यांचे आजोळ सातारा जिल्हय़ातीलच वेळेकामथी हे असल्याने त्यांची सातारची नाळ आधीपासुनच जोडली गेली आहे. म्हणूनच त्या गेली आठ वर्षे सातारा येथे स्थायिक होऊन संपुर्ण सातारा जिल्हय़ात योगाचे कार्य करीत आहेत. त्यांचे पती सुभाष चौगुले हे आयुर्विमा महामंडळामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असताना जिथे बदली होईल तिथे उमाताई योग प्रचाराचे कार्य करीत असत.
आजपर्यंत सांगली, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, मालवन, तारकरली, देवबाग, वाई आदी ठिकाणी त्यांनी शास्त्रोक्त योग प्राणायामाचा प्रसार केला आहे. तसेच देश-विदेशात त्यांची शिष्यमंडळी आज योगासनाचे धडे घेत आहेत. समाजकार्याची आवड असणाऱ्या उमा यांनी समाजाला आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी व योगप्रचारासाठी स्वत:ची ‘निरामय प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतंर्गत अनेक मोफत आरोग्य विषयक शिबिरे योग प्राणायम शिबिरे, महिला दिन, नववर्ष स्वागत यात्रा, जिल्हा-राज्यस्तरीय योगासन स्पर्धा अनेकवेळा आयोजित केली आहेत. तसेच कोरोनाच्या संकटात अनेकवेळा ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत योगप्राणायाम शिबिरे व 21 जुन योगदिनानिमित्त मोफत योग शिबिरे घेतली आहेत.
एक गृहिणी असून जिद्द, चिकाटी, सातत्य व आवड या जोरावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध योगासन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन 300 हून अधिक सुवर्ण, रौप्य, कास्य पदके, स्मृतीचिन्ह, सन्मानचिन्ह प्राप्त केली आहेत. थायलंड, बँकॉक, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, कोलंबो, श्रीलंका आदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, सुवर्ण पदक, प्राप्त करून भारत देशाचे व सातारा जिल्हय़ाचे नाव उंचाविले आहे.
योगतज्ञ उमा चौगुले यांनी एम.ए योगशास्त्र, योगशिक्षक, योगअध्यापक, योग प्रविण, योग व निसर्गोपचार तज्ञ, MS BORD OF VOCATIONAL, Y.C.M.O.U कालीदास युनिव्हर्सिटी नागपुर, भारतीय योग विद्याधाम आदी विद्यापिठातुन योगशास्त्रातील प्राविण्य त्यांनी विशेष श्रेणीमध्ये प्राप्त केली आहे. नुकतेच भारतीय खेल प्राधिकरण (एसएआय) व मिनिस्ट्री ऑफ युथ ऍफेयर्स अँड स्पोर्टस् गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी योगासनाला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. तसेच खेलो इंडियामध्ये योगा गेम म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य योगसन स्पोर्टस्(MYSA) च्या त्या अधिकृत योग पंचपरिक्षक (YOGYA REFREE) आहेत. उमा चौगुले सातारा जिल्हय़ातुन अनेक योग खेळाडु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविले आहेतच आता खेलो इंडियासाठी योग खेळाडु घडविण्याचा ध्यास आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत योगप्रचाराचे कार्य अखंड पणे करीत राहिन आणि सामाजिक भावनेतून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्पही त्यांनी केला आहे. आणखी एक त्यांचे विशेष म्हणजे कोणतेही साहित्य न वापरता फक्त हातांच्या सहाय्याने वारली रांगोळी साकारून राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत ही सलग तिन वर्षे प्रथम पारितोषिके प्राप्त केले आहे.
आजवरचे अच्युत्तम सन्मान
जागतिक योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या हस्ते सन्मानित, दापोली येथे योगसम्राज्ञी, ललिता बाबर यांच्या हस्ते ‘अस्तित्व’ पुरस्कार, ‘झी-24 तास’ वरील स्मार्ट वूमेन कार्यक्रमात ‘श्रावण क्विन’ या प्ररस्काराने, जिल्हा सत्र न्यायाधीश जी. बी. विष्ट यांच्या हस्ते ‘योग भुषण’ पुरस्कार त्याचबरोबर कराड येथे नुकताच पार पडलेल्या प्रतिष्ठा फाउंडेशन आयोजित साखर आयुक्त व ज्येष्ठ साहित्यिक शेखर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना ‘प्रतिष्ठा योगरत्न पुरस्कार’ ने गौरविण्यात आले आहे.
अशा या कौटुंबिक, जबाबदारी सांभाळून सामाजिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग व निरोगी आरोग्याचे महत्व पटवुन देण्यासाठी धडपडणाऱया या योगसम्राज्ञी उमा चौगुले यांचे कार्य खुपच कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे, त्यांच्या कर्तुत्वाला आमचा सलाम…