26 वर्षांपासून धरणे आंदोलन करणाऱया माजी शिक्षकाची घोषणा
उत्तरप्रदेश निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. या निवडणुकीत एका व्यक्तीने राज्यातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत यंदा एक व्यक्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आव्हान देणार आहे. राज्यातील माजी शिक्षक विजय सिंह यांनी गोरखपूर शहर मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आणि करहल मतदारसंघात अखिलेश यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.
विजय सिंह हे भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते असून ते मुजफ्फरनगरमध्ये मागील 26 वर्षांपासून धरणे आंदोलन करत आहेत. भूमाफियांच्या विरोधात कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. भूमाफियांनी पश्चिम उत्तरप्रदेशमध्sय हजारो एकर जमीन हडप केली असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
विधानसभा निवडणूक लढविणार असून 9 फेब्रुवारीला गोरखपूर शहर मतदारसंघासाठी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 11 फेब्रुवारी रोजी या मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. येथे 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला आहे.
लोकांना जागरुक करण्यासाठी निवडणूक लढतोय. मागील 26 वर्षांमध्ये उत्तरप्रदेशात सत्तेवर आलेला कुठलाही पक्ष भ्रष्टाचाराशी लढणे आणि भूमाफियांच्या विरोधात कारवाई करण्याप्रकरणी गंभीर असल्याचे विजय सिंह यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराशी लढण्यात राजकीय पक्ष आणि त्यानंतर सरकारची अनुत्सुकता लोकांसमोर आणणर आहे. याकरताच उमेदवारी अर्ज भरत असल्याचे विजय सिंह यांनी म्हटले आहे. 25 वर्षांपूर्वी एका मुलाला रडताना आणि स्वतःच्या आईकडे खायला मागताना पाहिले होते. त्याची आई त्याला काहीच देऊ शकत नव्हती. हजारो एकर जमीन शक्तिशाली नेत्यांनी हडपल्याचे पाहून दुःख झाल्याचे ते म्हणाले.