ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला यूपी एटीएफने मुंबईतील चुनाभट्टी परिसरातून अटक केली.
अमीन खान (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मांडवी येथील रहिवासी असून, झवेरी बाजार येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईतील न्यायालयीन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याला उत्तरप्रदेशला नेण्यात येणार आहे.
अमीन खान याने गुरुवारी (दि.21) रात्री साडेबाराच्या सुमारास योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज उत्तरप्रदेश पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सॲप नंबरबर केला होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होतेे की, ‘योगी अदित्यनाथ समाजाचे शत्रू आहेत, त्यामुळे मी त्यांना बॉम्बने उडवून देणार आहे.’ 8828453350 या मोबाईल क्रमांकावरून ही धमकी आली होती.