अखिलेश-मायावतींच नकार – प्रियंकांबाबत गूढ कायम
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. मी नेहमीच निवडणूक लढविली आहे, यावेळी पक्षाने निश्चित केलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे योगींनी म्हटले आहे. योगींच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांना स्वतःची रणनीति बदलावी लागणार आहे.
उत्तरप्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट पेले आहे. तर बसप सर्वेसर्वा मायावती यांनीही निवडणूक न लढविण्याची घोषणा खूप आधीच केली आहे. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वड्रा यांच्यावर आता सर्वांची नजर आहे, त्यांनी आतापर्यंत निवडणूक लढविण्यासंबंधी स्थिती स्पष्ट केलेली नाही.
2022 ची विधानसभा निवडणूक लढविणार आहे. कुणाला कोणत्या मतदारसंघाची उमेदवारी द्यावी याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेते असे योगींनी म्हटले आहे. राजकीय वर्तुळात योगी हे अयोध्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशवप्रसाद मौर्य यांनाही निवडणूक लढविण्यास सांगितले जाणार असल्याचे मानले जात आहे. अखिलेश, मायावती आणि प्रियंका वड्रा हे व्हर्च्युअल जगतात ट्विटरची लढाई लढू शकतात, जनतेच्या दरम्यान जाण्याचे साहस त्यांच्यात नसल्याचा दावा भाजपने केला आहे.