प्रतिनिधी / पणजी
शिर्डी स्टील कंपनीचे संचालक योगेश गोयल यांनी गोवा भारतीय वैद्यक परिषद (आयएमए) ला 1 लाख मास्क उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील 30 हजार मास्क आयएमएने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
आयएमएचे गोवा प्रमुख डॉ. सॅम्युएल अरवट्टीगी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी स्टीलचे संचालक गोयल यांनी कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेकडे 1 लाख मास्क तयार करून दिलेत. हे मास्क डॉक्टर्स तसेच या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आणि सार्वजनिक क्षेत्रात मदत कार्यात असलेल्यांना वापरता येतील. अरवट्टीगी यांनी गोयल यांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. ही सर्व मास्क नवी दिल्लीहून एअर इंडियाच्या खास विमानाने आणण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या भेटीवेळी योगेश गोयल हे उपस्थित होते. तसेच आयएमएचे अध्यक्ष सॅम्युएल, सचिव डॉ. सुधीर शेट, डॉ. सूरज प्रभुदेसाई इत्यादी उपस्थित होते. आयएमए गोवातर्फे राज्यातील डॉक्टर्स तसेच वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱयांना हे मास्क वितरित करण्यात येणार आहेत.