केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : आयुष 64 गोळ्यांच्या वितरण मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी / पणजी
भारतीय योग पद्धती जगाने स्वीकारली आहे. जगभरात या पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. सात वर्षापूर्वी भारताने जगाला योग दिला. त्यामुळेच कोविडची तीव्रता कमी झाल्याची कबुली संपूर्ण जग देत आहे. योगामुळेच कोरोनावर मात करण्यात अनेक देश यशस्वी ठरले, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. आयुर्वेद आणि ऍलोपथी यांची तुलना होऊ शकत नाही, असे मत व्यक्त करताना योगव्यतिरिक्त उनानी, सिद्धा, होमियोपथी यासारख्या अन्य भारतीय औषध पद्धती आज जगात मोठय़ा विश्वासाने वापरल्या जात आहेत, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
असिम्टोमेटिक, सौम्य आणि मॉडरेट कोरोना रुग्णांना ’आयुष-64’ गोळ्या वितरित करण्यासाठी पणजीत पाटो येथील पर्यटन भवन इमारतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय संशोधन परिषदेचे (सीसीआरएएस) गोवा उपसंचालक डॉ. दत्ता भट, सीसाआरएएसचे संशोधन अधिकारी डॉ. एच गुप्ता यांची उपस्थिती होती. केंद्रीय आयुष मंत्रालय, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान परिषद यांनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतात विविध विषाणुजन्य आजारांवर अतिशय प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. म्हणुनच सध्याच्या कोरोना स्थितीत आम्हाला जगातील कित्येक देशांना आयुष 64 औषधे यशस्वीरित्या पुरविणे शक्य झाले, असे श्री. नाईक यांनी सांगितले. केंद्र सरकारने यापूर्वीच अन्य राज्यांना सांगितलेल्या औषधांचे वितरण सुरू केले आहे, असे ते पुढे म्हणाले.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आयुष 64 हे औषध म्हणजे एक पॉली हर्बल फॉर्म्युलेशन असून असिम्टोमेटिक, सौम्य आणि मध्यम रुग्णांच्या उपचारात वैज्ञानिकदृष्टय़ा उपयुक्त सिद्ध झाले असल्याचे सांगितले. आयुष मंत्रालया अंतर्गत केंद्रीय संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) ते विकसित केले आहे. त्याशिवाय या औषधाला आयएमसीएसने मान्यता दिली आहे, कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री यांच्याहस्ते विविध सरकारी आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आदींना औषधांचा साठा वितरित केला. प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधीनी तो स्वीकराला. केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सचिव सुरज नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे मिलिंद महाले यांनी सुत्रसंचालन केले. सुभाष नाईक यांनी आभारप्रदर्शन केले.