मुंबई/प्रतिनिधी
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर १६ तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली होती.त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे.
प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत असून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.