प्रतिनिधी / बेळगाव
रंगोली संगीत परिवार कोलकाताच्या फेसबुक पेजवर संतोष विश्वास यांनी अकॅडमी ऑफ म्युझिकच्या शिष्य आणि गुरुंचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वप्रथम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राग भूप आणि कबीर भजन सादर केले. त्यांना तबल्यावर राहुल मंडोळकर आणि संवादिनीवर रोहिणी कुलकर्णी यांनी साथ दिली. टाळ साथ उषा रानडे यांनी केली.
त्यानंतर सारंग कुलकर्णी यांची शिष्या स्मृती चिकोडी हिचे संवादिनीवादन झाले. तिने राग बिहागमध्ये विलंबित एक तालातील बंदिश आणि त्यानंतर दुत तीन तालातील गत सादर केली. रोहिणी कुलकर्णी यांची शिष्या तन्मयी सराफ हिचे गायन झाले. तिने राग देसमध्ये झपतालातील ‘देखोरी ना माने श्याम’ ही बंदिश व ‘रैन भरी आज सखीरी’ ही तीन तालातील बंदिश आणि सरगम सहित नोमतोम पेशकश सादर केली.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. सुधांशु आणि सारंग कुलकर्णी यांच्या संवादिनी सहवादनाने झाला. शारंग बेळुब्बी यांनीही यामध्ये आपला सहभाग दिला. संवादिनीवर राग बागेश्री सादर केला. त्यानंतर मिश्र मांडमध्ये एक धून वाजविली. त्यांना तबल्यावर संतोष पुरी यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन प्रणाली नातू यांनी केले.