ओटवणे /प्रतिनिधी-
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा एकदा हक्काच्या ‘ब्लड बँके’ची जबाबदारी पार पाडली. संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून दहा युवकांनी या आठवड्यात सात रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले.
सहज सापडणाऱ्या ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा सध्या जिल्ह्यात तुडवडा आहे. त्यामुळे या रक्तदगटाची आवश्यकता देखील मोठ्या प्रमाणात आहे. या परिस्थितीत ओरोस येथील बालाजी अभ्यंकर, सावंतवाडी तालुक्यातील रामा गुरव, ममता वेर्णेकर, सुशिला मेस्त्री, शामल कुडव, दोडामार्गमधील स्नेहल कोरगावकर यांना तातडीनं या रक्ताची आवश्यकता होती. अशावेळी कोरोना संकट काळात रक्ताचे नातेवाईक देखील मदतीला येत नाहीत मात्र युवा रक्तदाता संघटनेचे हे युवक पुढे सरसावले. आणि त्यांनी या रुग्णांचे प्राण वाचविले.
यावेळी संघटनेच्या विनायक गांवस, भावेश भिसे, चिराग कदम, सुजय कोठावळे, निमिष पटेकर, साहिल पडवळ, अनंत मेस्त्री, भाऊसाहेब वर्तक, भरत पगारे, जय बांदेकर या युवकांनी रक्तदान केले. कोरोनाच्या संकट काळातही पुढं सरसावलेल्या युवा रक्तदाता संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.