कोरोना विषाणूच्या संसर्गावर सद्यःस्थितीत हाच उत्तम उपाय, भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती दुप्पट असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये कोरोना रूग्णांची वाढ काहीशी आटोक्यात आली असली तरी अद्याप धोका टळलेला नसल्याने तेथील प्रशासन विविध उपायांवर भर देत आहे. रक्तद्रव (प्लाझमा) उपचार या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे .त्यामुळे ब्रिटनने आपल्या देशातील भारतीय व आशियायी नागरीकांना मोठय़ा प्रमाणावर रक्तद्रव दान करण्याचे आवाहन केले
जे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांचा रक्तद्रव या उपचारांसाठी उपयोगात आणला जातो. या रक्तद्रवात कोरोना विषाणूंशी लढणारी आणि या विषाणूंवर मात करणारी प्रतिजैविके तयार झालेली असतात. हा रक्तद्रव कोरोना रूग्णांच्या रक्तात सोडल्यास या रूग्णांना ही प्रतिजैविके मिळतात आणि त्यांची कोरोनाशी लढण्याची शक्ती वाढते, असे दिसून आले आहे. सध्याच्या स्थितीत हा कोरोनातून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या रक्तद्रवासाठी मागणी चांगलीच वाढली असल्याचे दिसून येते.
भारतीयांनाच आवाहन का ?
ब्रिटीश किंवा युरोपियन नागरीकांची प्रतिकारशक्ती भारतीय किंवा आशियायी नागरीकांच्या प्रतिकारशक्तीपेक्षा कमी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. बरे झालेल्या भारतीय रूग्णांमध्ये कोरोनाशी लढणाऱया प्रतिजैविकांची संख्या अन्य नागरीकांपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचे संशोधनात आढळून आले. त्यामुळे भारतीय किंवा आशियायी नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट प्रतिसाद
आतापर्यंत भारतीय व इतर आशियायी नागरीकांनी रक्तदानाच्या आवाहनाला उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. असे आवाहन करण्यापूर्वीच कित्येक कोरोनामुक्त झालेल्या भारतीय व्यक्तींनी रक्तदान केले आहे. आता ब्रिटीश सरकारने अधिकृतरित्या असे आवाहन केल्यानंतर सध्यापेक्षाही जास्त भारतीय रक्तदान करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभावीपणावर शंकाही
कोरोनाबाधेवर रक्तद्रवाचा उपचार किती प्रमाणात प्रभावी ठरतो यावर आरोग्य तज्ञांमध्ये दुमत आहे. काही तज्ञांची धारणा हा उपचार फारसा यशस्वी होत नाही अशी आहे. मात्र, अनुभव असा आहे की, हे उपचार किमान 60 टक्के रूग्णांवर तरी प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे रक्तद्रवाला जगभरात मागणी आहे. कोरोनावरील खात्रीशीर लस अद्याप बाजारात यायची आहे. ती येईपर्यंत तरी रक्तद्रवाचा उपचार हा पर्याय ठरणार आहे, असेही अनेक तज्ञ सांगतात.
रक्तदानासाठी विशेष व्यवस्था
ब्रिटनमध्ये भारतीय व आशियायी नागरीकांची संख्या लक्षणीय आहे. यापैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र कित्येकजण आता पूर्णतः बरे झाले आहेत. त्यांना रक्तदान करता यावे यासाठी या देशाने अनेक स्थानी विशेष व्यवस्था केली आहे. रक्तदान सुरक्षितपणे करण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या वाढली तरी व्यवस्थापनात कोणतीही उणीव राहणार नाही, याची दक्षता ब्रिटीश प्रशासन घेतले असल्याचे सांगण्यात आले.
जर्मनीत शाळांमध्ये संसर्ग
बर्लिन : जर्मनीच्या या राजधानीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. शहरातील 41 शाळांमध्ये पुन्हा लागण झाली असून साधारणतः 150 विद्यार्थी आणि शिक्षक आजारी पडले. त्यामुळे शेकडो इतर विद्यार्थी व शिक्षकांना विलगीकरणात जावे लागले, अशी माहिती येथील बर्लिनर झियाटंग या वृत्तपत्राने दिली आहे. नुकतीच जर्मनीने शाळा उघडण्यास अनुमती दिली होती. आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक पालकांची हीच मागणी आहे.
दक्षिण कोरियात संसर्गवाढ
सोल : दक्षिण कोरियाने कोरोनावर जवळपास मात केली आहे, असे मानले जात असले तरी तेथे नव्या रूग्णांची संख्या पुन्हा एकवार वाढू लागली आहे. पूर्वी काही भागांमध्ये केंद्रीय असलेला हा विषाणू आता देशभरात झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. सर्वाधिक संसर्ग दाट लोकवस्तीच्या प्रदेशांमध्ये आढळत असून विरळ वस्तीत परिस्थिती तुलनेने बरीच नियंत्रात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
लॉकडाऊन सुरूच राहणार
क्राइस्टचर्च : कोरोनावर मात केल्याची घोषणा केलेल्या न्यूझीलंड देशात पुन्हा नवा उद्रेक आढळल्याने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये नागरीकांच्या हालचालींवरील बंधने कायम राहणार आहेत. शुक्रवारी या देशात 11 नवे रूग्ण आढळले. प्रशासनाचा कोणताही धोका न पत्कारण्याचा निर्धार आहे.
जपान निर्बंध हटविणार
टोक्यो : कोरोना उद्रेकामुळे विदेशी प्रवाशांवर घालण्यात आलेले निर्बंध हटविण्याचा विचार जपानने चालविला आहे. सप्टेंबरपासून पुन्हा विदेशी पर्यटकांना निवासी व्हिसा देण्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. स्थायी विदेशी निवासी, विदेशी विद्यार्थी, व इतर काही श्रेणींमधील विदेशी नागरीकांना काही अटींसह व्हिसा देण्याची योजना आहे. तथापि, सरसकट व्हिसा देण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले गेले.
रशियाची लस मेक्सिकोत
मेक्सिको सिटी : रशियाने तयार केलेल्या स्पुटनिक या कोरोनाविरोधी लसीच्या चाचण्या मेक्सिकोतही केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी रशिया आपल्या लसीचे 2 हजार डोस या देशात पाठविणार आहे. मेक्सिकोत कोरोना उद्रेक प्रचंड प्रमाणात असून अशा लसीची आम्हाला अत्याधिक आवश्यकता होती, असे या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले. लस प्रभावी असल्यास अधिक डोस मागविले जाणार आहेत.
शिक्षक अत्यावश्यक सेवक
वॉशिंग्टन : कोरोनचा उद्रेक असूनही अमेरिकेत शाळांना प्रारंभ करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. शाळा सुरू करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याकरिता शिक्षक हे अत्यावश्यक सेवक म्हणून गणले जातील अशी घोषणा करण्यात आली. अनेक शिक्षकांचा शाळा सुरू करण्यास विरोध आहे. तथापि, त्यांना कामावर येण्यास सांगितले जाणार आहे.
मंत्र्यांना बसली फटकार
डब्लिन : आयर्लंडचे कृषीमंत्री डारा कॉलेरी यांनी कोरोना उद्रेकाच्या काळात गोल्फ खेळाच्या कार्यक्रमात भाग घेतल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांमधून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्यागपत्र सादर करण्याची वेळ आली. या देशाच्या युरोपियन महासंघातील प्रतिनिधींसह 81 मान्यवरांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी सामाजिक अंतराचा नियम धाब्यावर बसविला गेल्याचा आरोप होत आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.