ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
येत्या 22 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. या निमित्ताने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) महिलांना एक खुशखबर देण्यात आली आहे. आयआरसीटीसीकडून महिलांसाठी एक विशेष ऑफर देण्यात आली असून ही ऑफर 24 ऑगस्टपर्यंत वैध असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घोषणापत्राद्वारे आयआरसीटीसीने ही ऑफर जाहीर केली आहे. तेजस एक्सप्रेस रेल्चेकडून प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करणाऱया सर्व महिला या संधीचा लाभ घेवू शकणार आहे. तेजस एक्सप्रेसचे तिकीट बुक करणाऱया महिलांना 5 टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. आयआरसीटीसीद्वारे संचालित केल्या जाणाऱया दोन तेजस एक्सप्रेस रेल्वेद्वारे प्रवास करणाऱया महिला प्रवाशांना कॅशबॅक दिला जाणार आहे. या अंतर्गत दिल्ली – लखनऊ आणि मुंबई – अहमदाबाद या मार्गांवर तेजस एक्सप्रेस रेल्वेचे संचालन केले जाते. या रेल्वेचे तिकीट बुक करणाऱया महिलांना या ऑफरचा लाभ घेता येईल.
दरम्यान, घोषित करण्यात आलेल्या कालावधी पुरतीच ही कॅशबॅक ऑफर लागू असणार आहे. या संधीचा फायदा महिलांना केवळ एका प्रवासासाठी नाही तर हव्या तेवढय़ा वेळा करता येणार आहे… आणि प्रत्येक प्रवासासाठी त्यांना कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅक ऑफरनंतर तिकीट दरात मिळालेल्या सूटची रक्कम ज्या खात्यातून तिकीट बुक होईल, त्या खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच ज्या महिलांनी ही ऑफर लॉन्च होण्यापूर्वीच तिकीट बुक केली आहेत अशा महिलांना देखील या कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे.