पत्नी-मुलीला 18 तासांपर्यंत ठेवले होते ओलीस
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानच्या जोधपूरमध्ये रजा न मिळाल्याने नाराज सीआरपीएफ जवान नरेश जाटने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. परंतु त्यापूर्वी त्याने सीआरपीएफच्या अधिकाऱयांवर दबाव आणण्यासाठी पत्नी आणि मुलीला घरातच 18 तासांपर्यंत ओलीस ठेवले होते. पोलीस आणि प्रशासनाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने अखेरीस चार अधिकाऱयांसमोर स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. जोधपूर येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात ही घटना घडली आहे. संबंधित जवान नरेश जाटचा रजेवरून वरिष्ठ अधिकाऱयासोबत वाद झाला होता.
नरेशची समजूत काढण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनाही बोलाविण्यात आले होते. जवानाने सीआरपीएफ महासंचालकांसमोर शरणागती पत्करण्याची अट ठेवली होती. महासंचालक तेथे पोहोचल्यावर त्यांच्यासमोरच जवानाने आत्महत्या केली आहे. नरेशकडे लाइट मशीनगन होती. या मशीनगनमधून त्याने अनेकदा हवेत गोळीबार केला होता. रजा मंजूर न झाल्याने नरेश त्रस्त होता.