वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रणजी क्रिकेट हंगामाला पुढील वर्षीच्या पाच जानेवारीपासून प्रारंभ केला जाणार आहे. या स्पर्धेच्या काढण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये बलाढय़ मुंबई, दिल्ली आणि कर्नाटक यांचा एकाच गटामध्ये समावेश झाला आहे तर बंगाल आणि हरियाणा यांना सोपा ड्रॉ मिळाला आहे.
या स्पर्धेचा ड्रॉ नुकताच काढण्यात आला. या ड्रॉ नुसार हैद्राबाद, महाराष्ट्र, उत्तराखंड यांचा इलाईट क गटात समावेश आहे. इलाईट ड गटामध्ये माजी विजेते सौराष्ट्र, तामिळनाडू, रेल्वे, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि गोवा यांचा समावेश आहे. गेल्या रणजी स्पर्धेतील उपविजेता बंगाल तसेच विदर्भ, हरियाणा, केरळ, त्रिपुरा आणि राजस्थान यांचा ब गटामध्ये समावेश आहे. इलाईट अ गटामध्ये गुजरात, पंजाब, हिमाचलप्रदेश, मध्यप्रदेश, सेनादल, आसाम, इलाईट ई गटामध्ये आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बडोदा, ओडिशा, छत्तीसगड, पाँडिचेरी, प्लेट विभागात चंदीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या संघांचा समवेश आहे. रणजी स्पर्धेतील सामने सहा शहरामध्ये खेळविले जातील. इलाईट अ गटातील सामने मुंबई, इलाईट ब गटातील सामने बेंगळूर, इलाईट क गटातील सामने कोलकाता, इलाईट ड गटातील सामने अहमदाबाद, इलाईट इ गटातील सामने त्रिवेंद्रम आणि प्लेट गटातील सामने चेन्नईमध्ये होणार आहेत.