बेंबळे / वार्ताहार
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडे पाच कोटी रुपयांचा अपहार झाला असून बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी आणि रोखपाल यांच्याविरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर या दोघांच्या विरोधात गुन्हा दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी कि, रतनचंद शहा सहकारी बॅंक लि. मंगळवेढा, शाखा टेंभुर्णी, ता.माढा या शाखेमध्ये प्रत्यक्षात उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रक्कमेमध्ये असलेली तफावतीची रक्कम रूपये १ कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ रुपये तसेच सन २०१६ ते सन २०२० या कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया, शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खातेमधील असलेली तफावतीची रकम रू. १ कोटी ९२ लाख २५ हजार त्याच बरोबर शाखेच्या दि. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सोलापूर, शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खातेमधील असलेली तफावतीची रक्कम रु. २ कोटी ४९ लाख ९० हजार अशी एकूण रक्कम रू.५ कोटी ५७ लाख ०२ हजार ८२२ रुपये इतक्या रकमेचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरु रा. सांगोला महाविद्यालयाच्या शेजारी, कडलास रोड, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर व तत्कालीन रोखपाल अशोक भास्कर माळी रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर या दोघांनी संगणमताने केलेला आहे. म्हणून सदरचा गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर गुन्ह्याचे तपासकामी दोन पोलीस तपास पथके तयार करण्यात आली आहेत. यातील आरोपीचा शोध सुरू असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्हयाचा तपास तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीण, अतुल झेंडे अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण व निरज राजगुरू (उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग,अकलूज) चार्ज करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.