गिर्ये समुद्रात नौका ताब्यातः सागर सुरक्षा दल आणि मत्स्य विभागाची संयुक्त कारवाई
वार्ताहर / देवगड:
देवगड समुद्रात मासेमारी करणाऱया नौकांवर व्हीटीएस यंत्रणेची ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ रत्नागिरी कोस्टगार्ड विभागाला मिळाल्याने सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. या पार्श्वभूमीवर देवगड सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गिर्ये समुद्र पट्टय़ात रत्नागिरी येथील एक नौका ताब्यात घेतली. या नौकेवर चिनी बनावटीची व्हीटीएस यंत्रणा सापडल्याने सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी ही नौका कारवाईसाठी देवगड बंदरात आणून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली. दरम्यान, या नौकेवर विनापरवाना चिनी बनावटीची व्हीटीएस यंत्रणा वापरण्यात येत होती. तसेच या नौकेतून पर्ससीन जाळय़ांद्वारे मासेमारी सुरू होती, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त रवींद्र मालवणकर यांनी दिली.
भारताच्या सीमेवर चीनकडून सतत कुरघोडय़ा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील देवगड ते कुणकेश्वरदरम्यानच्या समुद्री पट्टय़ात मासेमारी करणाऱया नौकांवर व्हीटीएस यंत्रणेची ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ कार्यरत असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी कोस्टगार्डला मिळाल्याने किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. मात्र, देवगड मत्स्य विभागाकडे गस्तीनौका नसल्याने सागरी सुरक्षा दलाला याबाबत माहिती देऊन समुद्रात ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ कार्यरत असणाऱया बोटींचा शोध घेण्याची मोहीम आखण्यात आली. शनिवारी समुद्रात दाट धुके व वादळसदृश स्थिती असल्यामुळे सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांना ‘सागरकन्या’ गस्तीनौकेने खोल समुद्रात ही मोहीम राबविणे शक्य झाले नाही. समुद्रात सुमारे चार ते पाच नॉटिकलपर्यंत वादळसदृश स्थिती दिसू लागल्याने ही मोहीम राबविणे धोकादायक बनले होते. त्यामुळे ही मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सागरी सुरक्षा रक्षक दल व मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे राबविली. तालुक्याच्या गिर्ये समुद्र पट्टय़ात 11 नॉटिकल अंतरात रत्नागिरी येथील ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ मिळणारी एक नौका सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांना आढळून आल्याने या नौकेची पोलिसांनी पाहणी केली.
मासेमारी नौका रत्नागिरीची!
ही नौका रत्नागिरी येथील इब्राहिम दाऊद साखरकर यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. या नौकेचा क्रमांक आयएनडी- एम. एच. 4. एमएम- 4020) असा असून या नौकेवर विनापरवाना चिनी बनावटीची व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यामुळे ही नौका सागर सुरक्षा दलाच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईसाठी देवगड बंदरात आणत मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली. या नौकेवर 31 कर्मचारी होते. या मोहिमेत देवगड सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक कऱहाडे, तेली, पोलीस हवालदार नीलेश पाटील, पोलीस नाईक तांबे आदी सहभागी झाले होते.
परवाना ट्रॉलिंगचा, मासेमारी ‘पर्सनेट’ जाळय़ांतून
मत्स्य विभागाने ही नौका ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तसेच नौकेवरील मासळीचा लिलाव करून नौकेवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त मालवणकर यांनी दिली. या नौकेवर चिनी बनावटीची व्हीटीएस यंत्रणा कार्यरत होती. तसेच या नौकेला ट्रॉलिंगचा परवाना असताना नौकेतून पर्ससीन जाळय़ांद्वारे मासेमारी करण्यात येत होती. याबाबत सागरी अधिनियम कायद्याप्रमाणे योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘त्या’ दोन नौकांची ‘चिनी सिग्नल फ्रिक्वेन्सी’ गायब
देवगड समुद्रात मासेमारी करणाऱया रत्नागिरीच्या नौकेवर चिनी बनावटीची व्हीएटीएस यंत्रणा होती. या यंत्रणेला भारतीय रजिस्ट्रेशन नव्हते. त्यामुळे चिनी भाषेतील फ्रिक्वेन्सी रडार यंत्रणेला मिळू लागल्याने कोस्टगार्ड ‘अलर्ट’ झाले. तीन नौकांवर ‘चिनी फ्रिक्वेन्सी’ मिळत असल्याची माहिती कोस्टगार्डकडून देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात एकच नौका सापडल्याने इतर दोन नौकांनी ही यंत्रणा काढून टाकली असावी, असा संशय मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे.
रत्नागिरी मत्स्य विभाग अंधारात?
रत्नागिरीच्या मासेमारी नौकांवर चिनी बनावटीची विनापरवाना व्हीटीएस यंत्रणा लावण्यात आली होती. तसेच ट्रॉलिंगचा परवाना असताना पर्सनेट जाळय़ांद्वारे मासेमारी करण्यात येत होती. ट्रॉलिंग मासेमारीची हद्द ओलांडून ही नौका देवगडच्या समुद्रात मासेमारी करत होती. ट्रॉलिंगच्या नौकेवर पर्सनेटची जाळी, विनापरवाना व्हीटीएस यंत्रणा व मासेमारीचे जलधी क्षेत्र असे सर्व नियम धाब्यावर बसविणाऱया या नौका राजरोसपणे मासेमारी करत आहेत. या प्रकाराबाबत रत्नागिरीचा मत्स्य विभाग अंधारात असल्याचे दिसत आहे.