प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी सागरी सुरक्षा दलाने रत्नागिरी समुद्रात दोन वावाच्या आत अनधिकृतपणे पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणाऱया गोवा राज्यातील 2 नौकांवर धडक कारवाई केली आहे. त्या दोन्ही नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
अनधिकृतपणे रत्नागिरी समुद्रात मासेमारी करणाऱया परराज्यातील या नौकांवर रत्नागिरी सागरी सुरक्षा पोलीस दलाचे एपीएसआय केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष पाटेकर, पीएसआय मनोज कुमार सिंग, एस. आय. कैलास भांडे, एसआय पी. के. सारंग, विनोद शांताराम महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल मुख्यालय व सुरज जाधव या टीमने कारवाई केली. यात मिसीसीपी-1 व स्टार ऑफ विलीनकिनी-2 या दोन नौका पकडून मत्स्य खात्याचे अधिकारी पाठारे यांच्या ताब्यात दिल्या.
या दोन्ही नौकांवरील तांडेलासह सुमारे 30 -35 खलाशी मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईनंतर दोन्ही नौका भगवती बंदरात नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरील खलाशांवर पुढील कायदेशीर कारवाई मत्स्य विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली.