देवगडनजीकची घटना : सर्व 24 खलाशी सुखरुप : बोट किनाऱयावर आणण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-गिर्ये कालवशी किनाऱयासमोरील समुद्रात सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी भाटये येथील ‘हसनैन’ ही बोट मासेमारी करीत असताना खडकावर आदळल्याने पाण्यात उलटून बुडाल्याची घटना घडली. या बोटीवर असलेल्या 24 खलाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. रत्नागिरीतील चार बोटींच्या सहाय्याने मदतकार्य सुरू असून सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत बोटीला विजयदुर्ग बंदरात आणण्याचा प्रयत्न सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी भाटये येथील आजीम होडेकर यांच्या मालकीची ‘हसनैन’ ही बोट सोमवारी पहाटेच्या सुमारास गिर्ये पवनचक्कीसमोरील कालवशी किनाऱयालगत मासेमारी करीत असताना अचानक खडकावर आदळल्याने उलटली. या बोटीवर सुमारे 24 खलाशी होते. त्यांनी बोट बुडत असल्याचे लक्षात येताच मालक आजीम होडेकर यांना माहिती दिली. तसेच बोटीवर असलेल्या डिगीचा (छोटी होडी) आधार घेतला. त्यानंतर समुद्रात नजीकच मासेमारी करीत असलेल्या रत्नागिरीतील दोन बोटी व सागरी नाटे व राजीवाडा येथील एक अशा चार बोटी या बोटीच्या मदतीसाठी पोहोचल्या. ‘हसनैन’ बोटीवरील सर्व खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, बोट खडकात फसलेली असल्याने बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बोटीवरील जाळी काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सोमवारी सायंकाळी उशिरा विजयदुर्ग किनाऱयानजीक बोट आणण्यात आली.
‘हसनैन’ ही बोट रत्नागिरी येथील शेख अहमद यांच्या नावे असून ती भाटये येथील आजीम होडेकर यांनी घेतली आहे. याबाबत बोलताना आजीम होडेकर म्हणाले, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोट बुडत असल्याबाबत खलाशांनी माहिती दिली. त्यामुळे बोटीनजीक मासेमारी करीत असलेल्या रत्नागिरी येथील बोटींना याची तात्काळ माहिती दिली. त्यामुळे बोटीवरील खलाशांना वाचवू शकलो. बोट खडकावर आदळल्याने बोटीला भेगा गेल्या. त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरले. बोट एका बाजूने पाण्यात बुडत गेली. बोटीवर खलाशांनी प्रसगांवधान राखत डिगीचा आधार घेतला. जेव्हा मदतीसाठी बोटी आल्या, तेव्हा खलाशांना त्या बोटीवर घेण्यात आले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र, बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. बोट विजयदुर्ग किनाऱयावर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाण्याला करंट असल्याने बोट किनाऱयावर आणण्यात अडथळा येत होता.