प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुरूड समुद्रात अवैधपणे मासेमारी एलईडी लाईट लावून मासेमारी करणारी 1 एलईडी व 2 पर्ससीननेटधारक नौका प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे व त्यांच्या पथकातील अधिकारी व यांच्या उपस्थितीत मुरूड समुद्रात पकडण्यात आल्या आहेत. या 3 नौकेवरील 20 लाख रक्कमचे अवैध मासेमारी साहित्यासह नौकेवरील खलाशी व तांडेल अशा 35 जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये रत्नागिरी बंदरातील ‘जय भैरी’ आयएनडी. एम.एच.-4. एम.एम.1180 ही 6 सिलेंडरची एलईडी नौका, धनदौलत आय.एन.डी.एम.एच. 4 एम.एम.1024 ही 6 सिलेंडरची पर्ससीननेट ही नौका, धनलक्ष्मी आय.एन.डी.एम.एच.4 एम एम 1481 ही 6 सिलेंडरची नौका मुरूड समुद्रकिनारी मत्स्य विभागाने कारवाई करत पकडली. या नौकांवरील एलईडी दिवे, जनरेटर, बॅटरी, 300 किलो बारीक मच्छी ताब्यात घेण्यात आली.
समुद्रात 35 किमी अंतरावर एलईडीने मासेमारी चालू असल्याची खबर मुरुडचे मच्छीमार नेते प्रकाश सरपाटील व कोळी बांधवाना लागली. यानंतर मच्छीमार नेते सरपाटील व कोळी बांधवांनी तातडीने प्रादशिक उपायुक्त मत्स्य विभाग महेश देवरे, मत्स्य विभाग सहाय्यक आयुक्त मुंबई संजय वाटेगावंकर, मत्स्य विभाग अधिकारी मुंबई संजय माने याना घेऊन रात्रीच धाड घातली. रात्रीच्या अंधारात पूर्ण शहर उजळून निघेल, इतका एलईडीचा प्रकाश होता. पोलीस व अधिकाऱयांनी बोटींच्या जवळ जाऊन बंदुकीचा धाक दाखवून खलाशांना ताब्यात घेतले व सकाळी आगरदांडा बंदरात आणले.
प्रादशिक उपायुक्त मत्स्य विभाग महेश देवरे, मत्स्य विभाग सहाय्यक आयुक्त मुंबई संजय वाटेगावंकर, मत्स्य विभाग अधिकारी मुंबई संजय माने, परवाना अधिकारी स्वप्निल दाबणे, परवाना अधिकारी तुषार वाळुंज, सुरक्षारक्षक केतन भगत, अलिबाग पोलीस मुख्यालय पोलीस शिपाई ओमकार सोंडकर, पोलीस शिपाई दामोदर खटले, पोलीस हवालदार योगेश हटकर, उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले आदीनी कारवाईत सहभाग घेतला.