प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील धनजीनाका ते मच्छीमार्केट रोडवरील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरटय़ांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. गुरूवारी रात्री ही घटना घडली. चोरटय़ांनी एटीएम लुबाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, तोडफोडही केली. सुदैवाने एटीएममधील कॅश अबाधित राहिल्याचे समोर आले. एटीएमची तोडफोड करताना चोरटय़ांचे कृत्य तेथील सीसीटीव्हीत कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून लवकरच या चोरीवर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लॉकडाऊननंतर आता अनलॉक 5 च्या दिशेने वाटचाल सुरू असताना जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे गेले काही महिने चोऱया, घरफोडय़ांना प्रतिबंध झालेला होता. मात्र आता या गुन्हेगारीत वाढ होण्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून नागरिकांना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन काळात मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या गुन्हय़ांत वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोऱयांच्या गुन्हय़ांना लगाम बसला होता. मात्र गुरूवारी रात्री मच्छीमार्केट ते धनजीनाका रोडवरील भरवस्तीतील एटीएम फोडून चोरटय़ांनी खळबळ उडवून दिली. एटीएम फोडून रोकड लांबवण्याचा चोरटय़ांचा इरादा होता. त्यासाठी चोरटय़ांनी एटीएमची तोडफोड करत आतील कॅशवर डल्ला मारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण आतील कॅश चोरटय़ांच्या हाती लागण्यात अपयश आले.
ही बाब परिसरातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकाराचा तपास सुरू झाला आहे. ठसेतज्ञांना पाचारण करून त्या ठिकाणचे ठसेही घेण्यात आले. त्यामुळे त्या ठशांशी पोलीस रेकॉर्डला असलेल्या काही सराईत गुन्हेगारांशी काही संबंध आहे की अन्य कोणी आहे, याची खातरजमा केली जाणार आहे. चोरटय़ाच्या हालचाली सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. लवकरच ते सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास उलघडण्यासाठी वेगाने चक्रे फिरवण्यात आली आहेत.