प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागलेली असतानाच तज्ञांनी तिसऱया लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जाते. जिल्हय़ातील बालरोगतज्ञांनी या आव्हानाला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. रत्नागिरीत एकूण 65 बेडची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. 30 ऑक्सिजन आणि 6 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जिल्हय़ातील बालरोगतज्ञांचा टास्क फोर्सही सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हय़ात फेब्रुवारीच्या शेवटच्या आवडय़ात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यानंतर मार्च व एप्रिलमध्ये रूग्ण संख्या झपाटय़ाने वाढली, बाधितांना बेड मिळणे कठीण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. त्याचवेळी आता तिसऱया लाटेचे व त्यात लहान मुलांना अधिक लागण होण्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. ही शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून खासगी आणि शासकीय डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. बालक रूग्णालयात दाखल झाल्यावर कोणते औषधे द्यावे, कोणत्या केंद्रात दाखल करावे, ऑक्सिजन केव्हा लावावा याबाबत टास्क फोर्स महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
अशी आहेत लक्षणे
बालकांमध्ये म्हणजे नवजात बालकांपासून 18 वर्षांपर्यंतच्या युवकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येत आहेत. काही बालकांना रूग्णालयात दाखलही करण्यात आले होते. यात ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब अशी लक्षणे सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांकडे तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालकांसाठी स्वतंत्र सोय
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता रत्नागिरी शहरातील स्वस्तिक हॉस्पीटलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र कोव्हीड रूग्णालय तयार करण्यात आले आहे. याठिकाणी 45 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
बाधितांपैकी 5 टक्के बालकांना गंभीर त्रास शक्य
बालकांमधील 95 टक्के संसर्गात तीव्रता नसते. मात्र 5 टक्के बालकांमधून दोन ते तीन टक्के बालकांना तीव्र संसर्ग होवू शकतो. किडनी, हृदयविकार, डायबेटीस, अस्थमाचा त्रास असणाऱया बालकांना अधिक जपावे लागणार आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे किंवा जे कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांच्यात तीव्र ताप, डोळे आल्यासारखे वाटणे, पोटात दुखणे ही लक्षणे आढळून येतील असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे.