माळनाका येथील प्रकार, पतीवर आरोप, पोलीस तपास सुरु
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील धवल कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱया पती-पत्नीच्या वादाचा सोमवारी भडका उडाला. या वादातून पतीने पत्नीला धारधार हत्याराने भोसकले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास माळनाका येथे घडली.
यासंदर्भात पोलिसांनी पत्रकारांना माहिती दिली. आसावरी अमोल देसाई (30) ही माहेरी राहते. तिचा पती महाड एमआयडीसी येथे कामाला असून पती हा नाचणे येथे वास्तव्याला असतो. काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. सोमवारी सायंकाळी पत्नीला भेटण्यासाठी तो धवल कॉम्प्लेक्स येथे गेला होता. पत्नी बाजारात गेली असल्याने तो तिची वाट पाहात धवल कॉम्प्लेक्सनजीक लिमयेवाडीजवळ रस्त्यावर उभा होता. पत्नी बाजारातून परतल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाले आणि या वादातून पतीने पत्नीला धारदार हत्याराने भोसकले. यात आसावरी ही गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी तातडीने आसावरी हिला तपासले. तिच्यावर उपचार सुरु केले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी माळनाका परिसरातील घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर एक सॅक पडलेली दिसून आली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले.
जबर जखमी झालेल्या महिलेने पतीकडून होणाऱया त्रासाची माहिती पोलिसांना दिली. वारंवार मारहाण त्याचबरोबर पती संशय घेत असल्याची तक्रार तिने दिली. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला असून उचित कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.