तिघांवर गुन्हे दाखल, रिक्षाही जप्त
प्रतिनिधी / मसुरे:
लॉकडाऊन असताना रत्नागिरी येथून मालवण तालुक्यातील चुनवरे येथे गावी आलेल्या एका 28 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाला आंबेरी चेकपोस्ट परिसरात रिक्षाने आणण्यास गेलेल्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवासासाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त करण्याची कारवाई मसुरे पोलिसांनी केली आहे. या युवकाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हा युवक रत्नागिरी येथे वाहन चालक आहे. 20 मार्च रोजी तो रत्नागिरी येथे गेला होता. 22 रोजी तो रत्नागिरी येथून परतणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे तो तेथेच अडकून पडला. 16 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता तो रत्नागिरीहून सागरी महामार्गाने घरी येण्यास निघाला होता. आंबेरी पोलीस चेकपोस्ट पूर्वी तो आडवाटेने जंगलातून चेकपोस्ट चुकवत सिंधुदुर्ग हद्दीत आला होता. येण्यापूर्वीच त्याने गावी फोन करत भाऊ व अन्य एकाला आंबेरी येथे बोलविले होते. रिक्षातून हे तिघेही रात्री 8.30 वाजता चुनवरे गावठणवाडी येथे आले होते. आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच 17 रोजी त्याला जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले. पोलीस पाटील महेश परब यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर मसुरे पोलीस हवालदार प्रमोद नाईक, कॉन्स्टेबल विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय यांनी चुनवरे येथे जाऊन या युवकासह इतर दोघांना ताब्यात घेतले. साथरोग प्रतिबंधक अधिनियम 3, 4, भा. दं. वि. कलम 269, 270, 290, 291, 188 नुसार शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस प्रमोद नाईक, कॉन्स्टेबल विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय करत आहेत.