वार्ताहर / मौजेदापोली
राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित न्याय मागण्यांकरीता व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा लक्षणिक संप करीत असल्याचे दापोली येथील ग्रामसेवक युनियनने दापोलीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या संपात राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संवर्ग सहभागी होत असल्याचे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. संघटनेच्या आदेशानुसार दापोली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी 26 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय लक्षणिक संप करणार आहेत. मात्र यात कंत्राटी ग्रामसेवक सहभागी होणार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतींचे सचिव म्हणून काम पाहणारे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची एक दिवस खुर्ची रिकाम राहणार आहे. त्यामुळे तातडीचे काम रखडण्याची शक्यता आहे.