प्रतिनिधी / दापोली
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी ७ व्या वेतन आयोगाच्या अंम्मलबजावणी करिता कर्मचारी समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. या प्रतिनिधींना मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट घेण्याचे मान्य केले आहे. यामुळे या आंदोलनाला तत्वतः यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
७ वा वेतन आयोग लागु करण्यासबंधीत ही भेट आयोजित केली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील प्रत्येकी एक समन्वय संघांचे अध्यक्ष असे ऐकून चार प्रतिनिधी त्यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यात राहुरीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. देवकर, दापोलीचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. नाईक, परभणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे आणि अकोला कृषि विद्यापीठातुन डॉ. संजय कोकाटे यांच्या नावाला शरद पवार यांच्या कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. जोपर्यत ७ वा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यत आपला लढा मात्र चालूच राहील असे देखील समन्वय समितीच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे. लेखणी बंदच्या दुसऱ्या दिवशी देखील विद्यपीठातील कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले होते. यामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.