माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांची मागणी
जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्यासमवेत मंत्र्यालयात बैठक
कोकणासाठी मापदंडात वाढ करण्याचीही आग्रही मागणी
प्रतिनिधी / खेड
कोकणातील पाणीप्रश्नी माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांच्या दालनात बैठक घेत कोकणातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देवून निधी देण्याची आर्जव केली. कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक प्रकल्प मापदंडात बसत नाहीत. यासाठी कोकणासाठी मापदंडात वाढ करण्याची आग्रही मागणी देखील केली आहे.
कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही फक्त दीड टक्केच सिंचन झालेले आहे. पाटबंधारे, जलसंधारण कामासाठी कोकणावर सातत्याने अन्यायच झालेला आहे. या पार्श्वभूमीवर माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जलसंधारण मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. कोकणातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जलसिंचनात वाढ होण्याच्या दृष्टीने पाटबंधारे योजना होणे गरजेचे आहे.
याकरिता कोकणासाठी मापदंडात बदल करून वाढ करण्याची नितांत गरज असल्याचे पटवून दिले. त्यानुसार जलसंधारणमंत्री गडाख यांनी कोकणासाठी आवश्यक ते प्रयत्न सर्व अधिकाऱ्यांनी करण्याच्या सूचना देत कोकणातील सिंचनाचा प्रश्न तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या.
मापदंडात बदल करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सूचित करत कोकणातील परिपूर्ण प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देखील दिले. यापुढे कोकणातील योजनांबाबत आमदारांची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील केल्या. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी कोकणाचे दौरे करून पूर्वीच्या योजनांची पाहणी करण्याच्याही सूचना देत अपूर्ण योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे आदेश देखील जलसंधारण मंत्री गडाख यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याचवेळी आमदार योगेश कदम यांनीही दापोली मतदार संघातील शिवतर भडवळे, कुडावले, पालगड, साकुर्डे, सातेरेतर्फ नातू, करंजाणी कर्डे नारगोली, कादवण , बामणघर, आंबवली, वडगाव आधी १३ पाटबंधारे योजना व २० सिमेंट बंधाऱ्याबाबत जलसंधारणमंत्री गडाख यांच्याशी चर्चा करत योजनांना लवकरात लवकर मंजुरी देण्याचे साकडे घातले. या बैठकीस आमदार योगेश कदम, जलसंधारणाचे सचिव, मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व महामंडकाचे अधिकारी उपस्थित होते.