प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येवू लागले आहे. साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल कोकण मार्गावर धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळालेला असतानाच २४ ऑक्टोबरपासून मडगाव – मुंबई फेस्टिवल स्पेशलही धावणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर धावणाऱ्या या गाडीमुळे कोकणवासियांची चांगली सोय होणार आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर २२ मार्चपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना सलग ५ महिने ब्रेक लागला होता. गणेशोत्सव कालावधीत धावलेल्या गणपती स्पेशल वगळता अन्य रेल्वेगाड्या यार्डातच थबकल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होवू लागला आहे. याचमुळे रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर फेस्टिवल स्पेशल गाड्या चालवण्यास सुरुवात केल्या आहेत. सद्यस्थितीत कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मडगाव मुंबई फेस्टिवल स्पेशलची घोषणा केली आहे. या स्पेशल गाडीच्या कोकण मार्गावर १६ फेऱ्या धावणार आहेत. ही गाडी मडगाव येथून दररोज सायंकाळी ४.४५ वाजता सुटून पहाटे ५.५० वाजता मुंबईला पोहचेल. परतीच्या प्रवासात मुंबई येथून रात्री ११.२० वाजता सुटून सकाळी १२.१० वाजता मडगावला पोहचेल. या गाडीला करमाळी, थिविम, पेर्णेम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, दादर आदी ठिकाणी थावे देण्यात आले आहेत.