प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या यार्डात विसावल्या. कोरोना नियंत्रणात येत असल्याने कोकण रेल्वे मार्गावर एकामागोमाग एक रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. आजमितीस कोकण मार्गावर ९ रेत्वेगाड्या धावत असून ४ नियमित व ५ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या ठप्प झाल्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच गेल्याने सलग ५ महिने रेल्वेगाड्यांना ब्रेक लागला होता. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्या चालवून चाकरमान्यांना दिलासा देण्यात आला. गणेशोत्सवानंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांनाही ब्रेक लागला. कोरोनाची तीव्रता हळूहळू कमी झाल्यानंतर कोकण मार्गावर रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी जोर धरू लागली.
प्रवाशांच्या आग्रही मागणीनंतर शासकीय नियमांचे पालन करत कोकण मार्गावर २६ सप्टेंबरपासून सर्वप्रथम दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस नियमितपणे चालवण्यात आली. यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर फेस्टीवल स्पेशल चालवून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला. सद्यस्थितीत कोकण मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज – मडगाव कोकणकन्या स्पेशल, लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम नेत्रावती स्पेशल, छत्रपती शिवाजी महाराज – मडगाव मांडवी स्पेशल या रेल्वेगाड्या नियमितपणे धावत असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
यापाठोपाठ जबलपूर – कोईमतूर, वेरावल – त्रिवेंद्रम, नागपूर – मडगाव, एर्नाकुलम – ओखा, गांधीधाम – तिरुनेलवेली या सुपरफास्ट साप्ताहिक गाड्या धावत आहेत. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळूर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक रेल्वेगाडी १७ डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहे. याशिवाय दादर – तिरुनेलवेली साप्ताहिक गाडीही १६ डिसेंबरपासून धावणार असल्याने प्रवाशी विशेषतः पर्यटक सुखावले आहेत.