सोशल डिस्टंस्टिंगचा फज्जा
वार्ताहर / संगमेश्वर
शासनाने सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता 9वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी 17 ते 22 नोव्हेंबर पर्यंत शासकीय केंद्रात कोविड 19 ची वैद्यकिय तपासणी करुन घेण्याचे सांगण्यात आले आहे. कोविड 19 ची तपासणी करुन घेण्यासाठी देवरुख येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गर्दी करीत आहेत. कोविडची वैद्यकिय तपासणी करुन घेण्यासाठी देवरुख येथे मोठया प्रमाणात शिक्षकांनी गर्दी केल्याने कोविड 19 च्या तपासणी केंद्रातच सोशल डिस्टंटिंगचा फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे.
शाळेत किंवा कॉलेजचा येण्याच्या अगोदर शिक्षकांनी कोविड 19 ची तपासणी करुन घेण्याचे सांगण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जवळपासच्या शाळांना तसेच शालेय कर्मचारी वर्गांना देवरुख येथे तपासणी केंद्र देण्यात आले आहे. सकाळी 10 वाजण्याची वेळ देण्यात आली आहे. या केंद्रात तपासणी करुन घेण्यासाठी मोठया प्रमाणात शिक्षक व कर्मचारी वर्ग येत आहेत. मात्र कोविड तपासणी केंद्रात असलेले डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग संख्येने कमी असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. तसेच तपासणी केंद्रात येणारे शिक्षक आणि शालेय कर्मचारी वर्ग यांची संख्या अधिक असल्याने सोशल डिस्टंस्टिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. आरोग्य विभागाने याठिकाणी योग्य नियोजन करणे आवश्यक असून कोविड 19च्या पार्श्वभूमीवर सर्व योग्य खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.