एका बुरा सिलेंडरमध्ये २१ जम्बो सिलेंडरची क्षमता
प्रतिनिधी / खेड
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सल्लागारपदी कार्यरत असलेल्या उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्या पुढाकारातून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात लवकरच ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
उद्योजक बुटाला यांच्या माध्यमातून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ४ ऑक्सिजन सिलेंडर कार्यान्वित केले जाणार आहे. एका सिलेंडरमध्ये २५० हून अधिक लिक्विडची क्षमता आहे. एका बुरा सिलेंडरमध्ये २१ जम्बो सिलेंडरची क्षमता असून ८८० लिटर असे प्रमाण राहणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढे येथील एक पथक कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून लवकरच ही प्रणाली सुरू होणार आहे.
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अविरतपणे झटणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना उद्योजक बुटाला यांच्या माध्यमातून यापूर्वी आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापाठोपाठच ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली उपलब्ध होणार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. याप्रसंगी उद्योजक कौस्तुभ बुटाला, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, वैद्यकीय अधिकारी एस. पी. गरूड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. शेळके उपस्थित होते.