प्रतिनिधी/खेड
आठवडाभरापूर्वीच अज्ञाताने महिलेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून ३४ हजार रूपये लांबवल्याची घटना ताजी असतानाच खेडमधील आणखी एका महिलेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून ५८ हजार ३४२ रूपये लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहरातील श्वेता आंब्रे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, श्वेता आंब्रे या शुक्रवारी (दि.२५) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एटीएममधून पैसे काढत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम कार्डचा पीनकोड दाबत असताना बारकाईने लक्ष ठेवून हातचलाखी करत कार्डची अदलाबदल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
या दोन अज्ञात चोरट्यांनी एका सराफाच्या दुकानातून १८ हजार ३४२ रूपयांचे सोने देखील खरेदी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे अधिक तपास करत आहेत.