दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
गुहागर / प्रतिनिधी
बिबट्याच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरी यांना मिळताच त्यांनी सापळा रचून गुहागर तालुक्यातील मुंडर- गिमवी या मार्गावर दोघांना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे गुहागर तालुक्यात बिबट्याची शिकार व त्यांच्या नखांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरी यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गुहागर तालुक्यातील मुंडर -गिमवी या मार्गावर सापळा रचला, या ठिकाणी केलेला तपासामध्ये बिबट्याची नखे विक्रीस जात असलेल्या दोघांची कसून तपासणी केली. यावेळेला सदर प्रकार उघडकीस आला. तब्बल अठरा नखे या दोघांकडून मिळून आली. याप्रकरणी दिलीप सिताराम चाळके, राहणार मुंडर व अक्षय आत्माराम पारधी, राहणार पेवे या दोघांना ताब्यात घेऊन गुहागर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी रात्री एक वाजता याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.