जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांची माहिती
स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत उल्लेखनीय काम
प्रतिनिधी / रत्नागिरी
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत रत्नागिरी जिह्यातील आठ गावे `ओडीएफ प्लस’ (हागणदारीमुक्त अधिक) घोषित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. मरभळ यांनी सांगितले. उल्लेखनीय काम करणाऱ्या जिह्यातील ग्रामपंचायतींना 15 ऑगस्ट रोजी `ओडीएफ प्लस’ (ओपन डिफेक्शन फ्री) म्हणून जाहीर करण्यात आले.
2018 मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)टप्पा -2 अंतर्गत रत्नागिरी जिह्यातील सर्व ग्रामपंचायती यापूर्वीच हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे मंडणगड तालुक्यातील सोवेली ग्रा.पं., दापोली तालुक्यातील देहेण ग्रामपंचायतीमधील तुरवडे गाव, चिखलगांव ग्रा.पं.मधील चिखलगांव गाव, खेड तालुक्यातील भिलारेआयनी ग्रा.पं., चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रा.पं.मधील मोरवणे खुर्द गाव, गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रा.पं.मधील काताळवाडीतर्फे अंजनवेल गाव, रत्नागिरी तालुक्यातील मेर्वॅ ग्रा.पं.मधील ठिकाण चक्रदेव गाव तसेच संगमेश्वर तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत अशी आठ गावे `ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
राज्य शासनाच्या मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृष्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा-अंगणवाडी व ग्रामपंचायत (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन, माहिती शिक्षण व संवाद चित्रमय संदेश या निकषाची पूर्तता करुन ग्रामपंचायती ओडीएफ प्लस केल्या गेल्या आहेत.
ओडीएफ प्लस अंतर्गत कामे करणार
ओडीएफ प्लस म्हणजे हागणदारीमुक्त अधिक. जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ओडीएफ प्लस अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. सर्व ग्रामपंचायतीमध्ये हागणदारीमुक्त अधिक या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करुन स्वच्छता शाश्वत ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे.
– ए. बी. मरभळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( जि.प. पाणी व स्वच्छता)
जिल्ह्यातील ओडीएफ प्लस गावांतील शौचालये असलेली एकूण कुटुंबेः
तालुका गाव एकूण कुटुंब व शौचालय
मंडणगड सोवली 165
दापोली चिखलगाव 175
तुरवडे (देहेण) 28
खेड भिलारेआयनी 258
चिपळूण मोरवणे खु. 147
गुहागर कातळवाडीतर्फे अंजनवेल 290
संगमेश्वर सागवे 201
रत्नागिरी ठिकाण चक्रदेव (मेर्वी) 2