प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वरमध्ये असा कोणताही स्ट्रेन सापडला नाही, डेल्टा प्लस स्ट्रेनचे 5 रुग्ण रत्नागिरी जिल्हय़ात आढळले असल्याचे वृत्त अतिशय चुकीचे आणि गैरसमज पसरवणारे आहे. संगमेश्वरमध्ये जे रुग्ण आढळले आहेत त्यांच्या लक्षणामध्ये कोणता वेगळा स्टेन आहे का? याची तपासणी चालू आहे. संगमेश्वर तालुक्यात 13 जूनला कंटेनमेंट झोनचा निर्णय घेण्यात आला यामध्ये कसबा, नावडी, म्हाभळे, धामणी, कोंडगाव आदी गावांचा समावेश आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे करण्यात येणाऱया तपासणीत 50 ते 52 नागरिक बाधित आढळले होते. अशा पध्दतीने सर्वच ठिकाणी म्युटेशनवर अभ्यास केला जातो. या धोरणाप्रमाणे संगमेश्वरमध्ये तपासणी होत आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील 7 डेल्टा प्लसमधील रत्नागिरीतील संगमेश्वरमधील 5 रुग्णांचा समावेश असल्याची रविवारी एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. या पोस्टनंतर विविध प्रतिक्रिया जिल्हय़ातून उमटत होत्या. इतकेच नव्हे तर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मुळात ही माहिती गैरसमज पसरवणारी आहे, ज्या माध्यमाने ही पोस्ट व्हायरल केली त्यांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी झूम मिटींगद्वारे पत्रकारांना सांगितले.
संगमेश्वर तालुक्यात 13 जूनला कंटेन्मेंट झोनचा निर्णय घेण्यात आला यामध्ये कसबा, नावडी, म्हाभळे, धामणी, कोंडगाव आदी गावांचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगळा स्ट्रेन आहे का? याबाबत ज्या रुग्णांवर उपचार सुरू होते ते रुग्ण उपचार घेऊन बरेदेखील झाले आहेत. तरीदेखील हा वेगळा स्ट्रेन आहे का? याबाबत तपासणी सुरू आहे. चाचण्यांचा अहवालही पाठवण्यात आला आहे. अशा चाचण्या नियमित केल्या जात असतात यात घाबरण्याची बाब नाही. कोणतीही खातरजमा न करता नव्या स्ट्रेनबाबत अफवा पसरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले..