प्रतिनिधी / खेड
दीपावली सुट्टीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीची वाट घरली आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी उसळत आहे. यापार्श्वभूमीवर २५ व २६ नोव्हेंबर याकालावधीत तुतारी एक्सप्रेसला एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एक्सप्रेस २२ डब्यांऐवजी सलग दोन दिवस २३ डब्यांची धावणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संकटानंतर कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना ब्रेक लागला होता. कोकण मार्गावर एकही रेल्वेगाडी धावत नव्हती. यापार्श्वभूमीवर कोकण मार्गावर तुतारी एक्सप्रेस चालवण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गणेशोत्सव कालावधीत दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस चालवण्यात आली होती. गणेशोत्सवानंतर १० सप्टेंबरला तुतारी एक्सप्रेसला ब्रेक लागला होता.
तुतारी एक्सप्रेस कोकण मार्गावर नियमित सुरू ठेवण्यासाठी आमदार योगेश कदम यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानुसार २६ सप्टेंबरपासून तुतारी एक्सप्रेस कोकण मार्गावर नियमितपणे धावत आहे. दीपावली सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. त्यानुसार कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी उसळत आहे. ही गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी सलग दोन दिवस तुतारी एक्सप्रेसला एक अतिरिक्त डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.