वार्ताहर / मौजेदापोली
लाकूड वाहतूक परवाना देण्यासाठी 6 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वन कार्यालयातील वनपाल गणेश खेडेकर यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे दापोली वनविभागाचे वनाधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले.
दापोली येथील शेतकर्याकडे तोडणी केलेली झाडे, जळाऊ लाकूड व इमारती लाकूड एका लाकूड व्यावसायिकाने विकत घेतली. सदर झाडे तोडण्याकरीता वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती. तोडलेल्या झाडांच्या लाकडांची वाहतुकीच्या पासाची मागणी करणेकरीता लाकूड व्यावसायिक तथा तक्रारदार यांनी परिमंडळ वन अधिकारी दापोली यांचे कार्यालय येथे जावून लोकसेवक गणेश खेडेकर व खाजगी इसम सचिन आंबेडे यांची 20 ऑगस्ट रोजी भेट घेतली. त्यावेळी आरोपी व खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येक वाहतुकीच्या पासकरिता 1 हजार 300 रूपये प्रमाणे 5 पासांची 6 हजार 500 रूपये रक्कमेची लाचेची मागणी केली. पंरतू सदर लाकूड वाहतुकीच्या पासकरिता शासकीय फि. 100 रू इतकी असताना आरोपी व खाजगी इसम तक्रारदार यांचेकडे 5 वाहतुकीच्या पास करिता 6 हजार 500 रूपये इतक्या रक्कमेची लाचेची मागणी केली होती.
त्यामुळे रत्नागिरी येथे लाचलुचपत विभागाकडे या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत दापोली येथे येवून दोन्ही आरोपींना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले होते.