प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शुक्रवारी (१८ डिसेंबर) दुपारी तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे, औंध येथील १४ मित्र दापोली पर्यटनाकरिता आले होते. हे सर्वजण पुणे औंध येथील स्ट्रेन ट्रॅक या कंपनीत कामाला होते. हे सर्वजण दापोली तालुक्यातील मुर्डी येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता दापोलीत आल्यानंतर चहा-नाश्ता घेऊन ते सर्वजण आंजर्ले येथील समुद्र पाहण्याकरिता गेले. मात्र, यांच्यापैकी अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
या चौदा जणांपैकी उबेद खान, सोहम चव्हाण, रोहित पलांडे यांच्यावर आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आंजर्ले समुद्रात ६ पर्यटक बुडाले होते. अभिनय केळसकर ,नितेश देवकर, नीलेश गुहागरकर, तृशांत भाटकर, अभिजीत भाटकर, बाळा केळसकर, आवा मयेकर, दीपा आरेकर, पपु केळसकर यांनी या ६ पैकी 3 जणांना बुडताना वाचवले. या सर्वांना ग्रामस्थांनी वाचण्यात मोठी मदत केली.